सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:46 IST2025-12-28T14:45:20+5:302025-12-28T14:46:05+5:30

जागा वाटपावरून महाविकास आघाडीतही मतभेद दिसून येत आहेत.

Sena, MNS on one side, Congress-NCP on the other; Possibility of a split in Mahavikas Aghadi | सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता

सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता

नाशिक: जागा वाटपावरून महाविकास आघाडीतही मतभेद दिसून येत आहेत. उद्धवसेना हा मोठा पक्ष असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) ला दुय्यम स्थान देऊन त्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जास्त जागा देण्याच्या तयारीत असल्याने मतभेद झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच उद्धवसेना आणि मनसे एकीकडे तर काँग्रेस, राष्ट्रवादी दुसरीकडे अशाप्रकारची शक्यता वर्तवली जात आहे.

"महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी (दि. २७) उद्धवसेना आणि अन्य मित्र पक्षांसमवेत बैठक होणार आहे. त्यामुळे आघाडीच्या माध्यमातून नाशिक महापालिकेच्या निवडणुका लढण्याचा प्रयत्न असणार आहे." - सुनील भुसारा, राष्ट्रवादी (शरद पवार)

शनिवारी (दि. २७) राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना यांच्यात चर्चा झाली. तसेच उद्धवसेना आणि मनसे यांच्यात देखील चर्चा झाली. राष्ट्रवादी (शरद पवार) चे निवडणूक प्रभारी सुनील भुसारा यांनी नाशिकमध्ये आल्यानंतर उद्धवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांच्याशी चर्चा केली. रविवारी (दि. २८) पुन्हा चर्चा होणार आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युतीची घोषणा झाल्यानंतर सध्या वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी आणि मनसे असे चित्र असले तरी आता ते बदलले आहे. जागा वाटपाच्या सुरुवातीला काँग्रेसने ३० ते ३५ जागा आणि राष्ट्रवादीने सुमारे ४० जागांची मागणी केली होती. उद्धव सेनेने भूमिका बदलत अधिक जागा मनसेच्या नावावर मिळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना किरकोळ जागा देऊ केल्याचे समजते. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

काय आहेत अडचणी?

सुरुवातीला उद्धवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा देण्यास तयार होती. मात्र, आता ५ जागा काँग्रेस आणि सहा जागा राष्ट्रवादीला देण्यास तयार झाल्याचे या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच इतक्या जागेवरून वाद वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने हेरलेल्या काही सक्षम इच्छुक उमेदवारांना फोन करून उद्धवसेना ऑफर देत असल्याची तक्रार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे देखील नाराजी आहे. त्याचप्रमाणे उद्धवसेनेचे देखील काही नेते भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चामुळे देखील संभ्रम असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Sena, MNS on one side, Congress-NCP on the other; Possibility of a split in Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.