सातपूरचे राजकारण : तिकिटासाठी मनसेतून गेले भाजपत अन् नाराज इच्छुक भाजपमधून गेले शिंदेसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:57 IST2026-01-08T12:55:50+5:302026-01-08T12:57:33+5:30
कोलांटउड्यांमुळे शिवाजीनगर येथील लढत लक्षवेधी

सातपूरचे राजकारण : तिकिटासाठी मनसेतून गेले भाजपत अन् नाराज इच्छुक भाजपमधून गेले शिंदेसेनेत
गोकुळ सोनवणे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांतराच्या कोलांटउड्यांमुळे सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रभागात सध्यातरी भाजपचे वर्चस्व आहे. आणि या वर्चस्वाला शिंदेसेनेकडून सुरुंग लावण्याची व्यूहरचना करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागात भाजप वर्चस्वासाठी, तर शिंदेसेना अस्तित्वासाठी लढणार आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवाजीनगर, ध्रुवनगर, श्रमिकनगर, धर्माजी कॉलनी, मोतीवाला कॉलेज, कार्बन नाका परिसर, माळी कॉलनी, हिंदी शाळा परिसर, जलनगरी परिसर आदी भागांचा समावेश आहे.
मागील निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी घेऊन दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, डॉ. वर्षा भालेराव हे उमेदवार निवडून आले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून दिनकर पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. परंतु आता त्यांच्यासह त्यांच्या मुलाला नगरसेवकपदाची आशा लागून राहिल्याने ज्या भाजपवर कठोर शब्दात टीका केली, त्याच भाजपत त्यांनी प्रवेश केला आहे. दरम्यान, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी पुन्हा भाजपत प्रवेश घेतला. भाजपच्या स्थानिक इच्छुक म्हणजेच हेमलता कांडेकर, सविता गायकर, प्रेम पाटील यांनी परस्पर पॅनल तयार करून जोरदार कार्यक्रम राबवून निवडणुकीपूर्वीच प्रचार मोहिमेत आघाडी घेतली होती. परंतु, निवडणुकीच्या तिकिटासाठी दिनकर पाटील यांना भाजपत येण्याशिवाय पर्याय नसल्याने अखेरीस या सर्वच कार्यकर्त्याची अडचण झाली. त्यामुळे या कार्यकर्त्यानी शिंदेसेनेत प्रवेश करून भाजपला आव्हान दिले आहे.
माजी नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी थेट निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता भाजपसमोर प्रेम पाटील, सविता गायकर, शकुंतला पवार आणि गुलाब माळी हे शिंदेसेनेचे उमेदवार उभे आहेत. यंदा नाशिकमध्ये सर्वच ठिकाणी भाजपला शिंदेसेनेने तगडे आव्हान दिले असून, एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. दरम्यान, मनसे-उद्धवसेनेची युती झाल्याने त्यांनीही अनिता वाव्हळ, कावेरी कांडेकर, छाया इंगवले, साहेबराव जाधव आदी उद्धवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत. तसेच लीला पवार, माधुरी खरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. मात्र, खरी लढत ही भाजप आणि शिंदेसेनेतच होणार आहे. प्रस्थापित भाजपचा शिंदेसेना कसा मुकाबला करणार, मतदार कोणाला जवळ करणार, हे येणारा काळच ठरवेल.
प्रमुख समस्या
अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला कानिटकर उद्यान प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. त्र्यंबकरोड ते बारदान फाटा रस्ता रुंदीकरण, धर्माजी कॉलनीतील नैसर्गिक नाला.