Rebuttal blows to the ballot box | बंडखोरीमुळे मतविभागणीचा बसणार फटका

बंडखोरीमुळे मतविभागणीचा बसणार फटका

ठळक मुद्देनांदगाव: निवडणूक राग-रंगहतबल भूमिपुत्र : अपक्ष उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवरच ठरणार विजयाचे गणित

संजीव धामणे
नांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात होत आहे; मात्र पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केल्याने चुरस निर्माण झाली आहे.
नांदगाव मतदारसंघात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने शिकून तिकडेच स्थलांतरित होण्याकडे तरुणांचा कल आहे. औद्योगिक रोजगाराच्या संधी नगण्यच आहेत. शेतीसिंचनाचा एखादा अपवाद वगळता नाव घेण्यासारखे प्रकल्प नाहीत. यंदाच्या मान्सूनमध्ये सगळीकडे महापूर आला असताना येथील नदी-नाले दुथडी भरून वाहिले नाहीत. शेती हाच रोजंदारी मिळविण्याचा मार्ग असला तरी पाण्याचा स्रोत नसल्याने इतर तालुक्यांपेक्षा येथील शेती कष्टप्रद व कमी उत्पन्नाची आहे. नार-पार प्रकल्पाकडे डोळे लावून बसलेले मतदार, मनमाड तालुकानिर्मिती, उद्योग- रोजगाराची वानवा आदी प्रश्न येथे भेडसावत आहेत.
पाण्याचा नसला तरी समस्यांचा पूर या मतदारसंघात आहे. निवडणुका जवळ आल्या की नांदगाव मतदारसंघ विक्रीला आहे, असा सूर भूमिपुत्रांकडून आळवला जातो; मात्र निवडणुकीत त्यांचे ध्रुवीकरण होऊन राजकारण फिरते. विद्यमान आमदार पंकज भुजबळ हे गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारांसमोर कौल मागत आहेत. तर शिवसेनेकडून सुहास कांदे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. मतदारसंघात शिवसेनेचे गावोगावी जाळे निर्माण झाले असले तरी, राष्टÑवादीनेही बºयापैकी हातपाय पसरले आहे. निवडणुकीत भुजबळ-कांदे यांच्यात प्रमुख लढत होत असली तरी, भाजपचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांनीही आव्हान उभे केल्याने मतविभागणीचा धोका वाढला आहे. ही मतविभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते हे येता काळच सांगेल. तिरंगी लढतीमुळे निवडणूक मात्र चुरशीची बनली आहे.
मतदारसंघातील
कळीचे मुद्दे
मनमाड व नांदगावचा पाणीप्रश्न, नार-पार प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश व्हावा.
४व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालये नाहीत. औद्योगिक वसाहत, शेतीवर आधारित उद्योगनिर्मिती.
४तालुक्यात रेल्वेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.
निकराची लढत होण्याची चिन्हे
मागील निवडणुकीत युती व आघाडी नव्हती. सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजप व सेनेतील मतविभागणीचा फायदा विजयी उमेदवाराला झाला होता. यावेळी युती असूनही भाजपच्या रत्नाकर पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मतांची विभागणी अटळ आहे. भाजपचे माजी आमदार संजय पवार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ तिसऱ्यांदा नशीब आजमावत असले तरी शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांचे पुन्हा एकदा कडवे आव्हान असल्याने लढत निकराची होणार आहे.
बदललेली समीकरणे
मनमाडच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर उमेदवार निवडून आल्याचा इतिहास आहे. गेल्यावेळी मनमाडचा पाणीप्रश्न ऐरणीवर होता. आज ८ ते १० दिवसांनी येणाºया पाण्यामुळे तो शिथिल झाला असला तरी करंजवणचे पाणी, हा मुद्दा पुढे आला आहे.
प्रशासकीयदृष्ट्या वेगळा पडलेल्या व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे दु:खी असलेल्या मालेगाव जिल्हा परिषदेच्या अडीच गटातील मतदारांची ताकद यावेळी पक्ष की व्यक्ती यापैकी कुणाकडे झुकणार, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल.
मागील निवडणुकीत सेना-भाजप स्वतंत्र लढले त्यावेळी दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी ५० हजाराच्या वर मते घेतली होती. यंदा भाजप उमेदवार राष्टÑवादीच्या गोटात दाखल झाल्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवाराला त्यांचे अधिकचे बळ वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Rebuttal blows to the ballot box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.