Rahul Aher, BJP's victorious horse race | भाजपचे राहुल आहेर यांची विजयी घोडदौड कायम
भाजपचे राहुल आहेर यांची विजयी घोडदौड कायम

चांदवड : चांदवड-देवळा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. त्यांनी कॉँग्रेस व राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार शिरीष कोतवाल यांचा २६,५३७ मतांनी पराभव केला आहे.
चांदवड-देवळा मतदारसंघाच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याने सकाळी वेग कमी होता. दुपारनंतर मात्र मतमोजणी प्रक्रियेला वेग आला. १४ टेबल्सवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासूनच युतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी ३५६८ मतांनी आघाडी घेतली. नवव्या फेरीत त्यांची आघाडी काहीशी कमी झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा आघाडी घेतली. २१व्या फेरीत २६,३४० मतांची आघाडी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केली. मात्र पाच ठिकाणचे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्याने त्यातील मतांची मोजणी सर्वात शेवटी करण्यात आली. त्यात तीन मशीनची मते दिसली.
तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित मशीनमधील मतांच्या चिठ्या काढून त्यांची उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. जसजसे फेरीनिहाय निकाल जाहीर होत होते तसतसे भाजप-सेना कार्यकर्त्यांची गर्दी प्रशासकीय इमारतीच्या आवारात वाढत गेली. डॉ. आहेर विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. निकालासाठी उशीर होत असल्याने अनेक उत्साही कार्यकर्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली.
निवडणूक अधिकारी सिद्धार्थ भंडारे व सहायक निवडणूक अधिकारी प्रदीप पाटील यांनी मतमोजणीसाठी परिश्रम घेतले.
विजयाची तीन कारणे...
1भाजप-शिवसेना युती व मोदी सरकारवर मतदारांचा विश्वास यामुळे एवढी मोठी आघाडी मारता आली.
2मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारांनी एका अर्थाने त्यांना कामाची पावती दिली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेली मदत व सरळ लढत झाल्याचा परिणाम.
3प्रचारात प्रांतवादाचा मुद्दा उपस्थित झाला असला तरी मतदारांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
कोतवाल यांच्या पराभवाचे कारण...
चांदवड तालुक्यात मतदारांची संख्या अधिक असली तरी प्रांतवादापेक्षा मोदी फॅक्टर अधिक प्रभावी ठरला. देशभरात कॉँग्रेसविरोधी असलेल्या वातावरणाचाही परिणाम येथील मतदानावर झाल्याने मतदारांनी भाजप-सेना युतीला अधिक पसंती दिल्याचे दिसते.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
२ शिरीषकुमार कोतवाल कॉँग्रेस 74619
३ दत्तू गांगुर्डे भाकप 2373
४ सुभाष संसारे बसपा 429
५ अनंत सादडे स्वंतत्र भारत पक्ष 435
६ सुनील अहेर अपक्ष 2200
७ प्रकाश कापसे अपक्ष 201
८ हरिभाऊ थोरात अपक्ष 506
९ संजय केदारे अपक्ष 5627

Web Title:  Rahul Aher, BJP's victorious horse race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.