Nashik Municipal Corporation Election : नेत्यांच्या पक्षांतराने उद्धवसेना-मनसे जागावाटपाला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:48 IST2025-12-26T13:47:09+5:302025-12-26T13:48:42+5:30
महाविकास आघाडी : काँग्रेस, राष्ट्रवादीची उद्धवसेनेसमवेत बैठक

Nashik Municipal Corporation Election : नेत्यांच्या पक्षांतराने उद्धवसेना-मनसे जागावाटपाला फटका
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात जागावाटपाची अंतिम चर्चा सुरू असतानाच उद्धवसेनेचे दोन माजी महापौर आणि मनसेचे प्रदेश सरचिटणीस यांनी भाजप प्रवेश केल्याने त्याचा फटका जागावाटपाला काहीसा बसला खरा. मात्र, पक्ष नेत्यांनी स्थानिक पातळीवर सावरून घेत चर्चा सुरूच ठेवली आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि. २५) महाविकास आघाडी आणि उद्धवसेनेत बैठक झाली असून त्यात जागावाटपावर चर्चा झाली.
महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धवसेना सुरुवातीपासून एकत्रच लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून या पक्षांमध्ये जागावाटपाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे, असे असताना माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर यतिन वाघ यांनी भाजपत प्रवेश केल्याने त्या प्रभाग क्रमांक १३ बाबत नव्याने समीकरणे तयार करावी लागणार आहेत. याच प्रभागात या दोन माजी महापौरांच्या कुटुंबीयांसमवेत स्थायी समितीचे माजी सभापती आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांनी भाजपत प्रवेश केल्याने काँग्रेसची देखील अडचण झाली.
दरम्यान, मनसे आणि उद्धवसेनेची बैठक देखील गुरुवारी सुरू झाली. यात आता मनसेची सूत्रे दिनकर पाटील वगळता अन्य नेत्यांनी हाती घेतली आहेत. पक्षाचे नेते डॉ. प्रदीप पवार, अतुल चांडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार तसेच अॅड. रतन कुमार इचम आणि सुजाता डेरे या सूत्रे सांभाळणार आहेत. त्यानुसार बैठक देखील झाल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धवसेनेच्या शालीमार येथील कार्यालयात झाली. यावेळी ९० टक्के जागावाटप निश्चित झाल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी सांगितले. या बैठकीला माजी आमदार वसंत गीते, उपनेते दत्ता गायकवाड, काँग्रेस पक्षाचे राजेंद्र बागुल, उल्हास सातभाई, डॉ. दिनेश बच्छाव, डॉ. सुभाष देवरे आदी उपस्थित होते.
उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसेला जागा जाणार
महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेतून मनसेला जागा देण्यात येणार असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी सांगितले. वंचित आघाडी आणि माकपच्या जागांबाबत देखील विचार करण्यात येणार असून येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय शक्य असल्याचे सांगण्यात आले.
खैरे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न विफल
काँग्रेस नेते शाहू खैरे यांनी कठीण काळात पक्षाला सोडून जाऊ नये यासाठी पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, उपयोग झाला नसल्याचे शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी सांगितले.