नाशिकमध्ये काकाने भाजपात प्रवेश करताच पुतण्याने दिला राजीनामा
By संजय पाठक | Updated: December 29, 2025 17:57 IST2025-12-29T17:56:47+5:302025-12-29T17:57:32+5:30
Nashik Municipal Corporation Election: विधानसभा निवडणूकीत नाशिक पश्चीम मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप हा लबाडांचा पक्ष असे म्हणून टीका केली होती. परंतु त्याच दिनकर पाटील यांना भाजपाने सन्मानाने प्रवेश दिल्याने त्यांच्या आधी भाजपात काम करणारे त्यांचे पुतणे प्रेम दशरथ पाटील यांनी आज राजीनामा दिला आहे.

नाशिकमध्ये काकाने भाजपात प्रवेश करताच पुतण्याने दिला राजीनामा
- संजय पाठक
नाशिक- विधानसभा निवडणूकीत नाशिक पश्चीम मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप हा लबाडांचा पक्ष असे म्हणून टीका केली होती. परंतु त्याच दिनकर पाटील यांना भाजपाने सन्मानाने प्रवेश दिल्याने त्यांच्या आधी भाजपात काम करणारे त्यांचे पुतणे प्रेम दशरथ पाटील यांनी आज राजीनामा दिला आहे. प्रेम पाटील हे शिवसेनेचे माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र आहेत.
दिनकर पाटील यांचा प्रवास जनता दल, काँग्रेस, बसपा आणि भाजपा असा होता. २०१७ मध्ये ते भाजपाकडून प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आले हेाते. पक्षाने त्यांना सभागृह नेतापद तसेच स्थायी समिती सभापती देखील दिले. परंतु पुढे लोकसभा आणि नंतर विधान सभा निवडणूकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. नाशिक पश्चीम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली हेाती. याच वेळी त्यांचे पुतणे प्रेम पाटील हे भाजपात दाखल झाले होते. त्यांनी भाजपच्या प्रचारासाठी या मतदार संघात बरेच परीश्रम घेतले. आता प्रेम पाटील हे प्रभागातून इच्छूक होते. त्यांनी भाजपकडे मुलाखत देखील दिली. मात्र, गेल्या आठवड्यात भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिनकर पाटील, त्यांची पत्नी माजी नगरसेविका लता पाटील, पुत्र अमोल पाटील अशा सर्वाना सन्मानाने प्रवेश दिला. त्यानंतर पाटील यांनी या प्रभागात आपल्या सोयीचे उमेदवार देखील परस्पर घाेषीत केले. त्यानंतर प्रेम पाटील यांनी पक्षाच्या वरीष्ठांना याबाबत अवगत केले. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस प्रेम पाटील यांनी राजीनामा दिला आहे.