पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:12 IST2025-12-29T14:12:22+5:302025-12-29T14:12:52+5:30
यंदा प्रभाग १३ सह अनेक प्रभागांत आयारामांमुळे भाजप विरुद्ध भाजप अशी स्थिती असली, तरी काही ठिकाणी शिंदेसेना आणि एका प्रभागात महाविकास आघाडी किंवा उद्धवसेनाही चांगले आव्हान असणार आहे.

पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
नाशिक : सर्वात हॉट प्रभाग म्हणजे पश्चिम विभाग! यंदा प्रभाग १३ सह अनेक प्रभागांत आयारामांमुळे भाजप विरुद्ध भाजप अशी स्थिती असली, तरी काही ठिकाणी शिंदेसेना आणि एका प्रभागात महाविकास आघाडी किंवा उद्धवसेनाही चांगले आव्हान असणार आहे. पश्चिम प्रभागात सध्या भाजपच्या स्वाती भामरे, हिमगौरी आडके आणि योगेश हिरे हे तिघे नगरसेवक होते तर सध्या शिंदेसेनेत असलेले अजय बोरस्ते एकमेव विरोधकांकडून निवडून आले होते. या प्रभागात सध्या भाजपत मोठी चुरस होती.
त्यात हिमगौरी आडके यांच्याऐवजी मागील वेळी सातपूरमध्ये दिनकर पाटील यांच्यासमवेत निवडून आलेल्या वर्षा भालेराव इच्छुक आहेत. अर्थातच, हिमगौरी आडके यांनी बाजी मारल्याची चर्चा असून, तसे झाल्यास वर्षा भालेराव यांना पुन्हा शिवाजीनगर येथे जावे लागेल, असे दिसते. यंदा आमदार देवयानी फरांदे देखील उमेदवारी करणार असून, असे झाल्यास शिंदेसेनेचे अजय बोरस्ते यांच्यासमोर एक तर अजिंक्य फरांदे किंवा योगेश हिरे आव्हान उभे करतील. अजय बोरस्ते यांचा परिसरात दबदबा असला तरी त्यांना पॅनलमध्ये नवख्यांना संधी द्यावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजप आणि महायुतीतील अन्य पक्षांचे मोठे आव्हान असणार आहे.
या प्रभागातून गेल्यावेळी भाजपचे शिवाजी गांगुर्डे, श्रीमती घाटे, काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील, समीर कांबळे हे नगरसेवक होते. मात्र, आता समीर कांबळे शिंदेसेनेत असून, डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात आहे. प्रियांका घाटे आता नाशिक सोडून गेल्या आहेत. शिवाजी गांगुर्डे यांना सुरेश पाटील, प्रशांत जाधव तर महिला गटात केतकी वस्पटे, संगीता जाधव, वंदना पालवे, सोनल वर्षा येवले, नृपूर सावजी, रोहीणी रकटे अशी नावे आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या पत्नी सीमा ठाकरे तर अनुसूचित जमाती गटासाठी स्मिता पाटोदकर, भाजप अनुसूचीत जाती आघाडीचे गणेश कांबळे आणि महापालिकेचे निवृत्त अभियंता राजू आहेर, किशोर घाटे दावेदारी करत आहेत.
प्रभाग १३ मध्ये उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांची सून आदिती पांडे, अॅड. यतीन वाघ, शाहू महाराज खैरे आणि माजी आमदार नितीन भोसले कुटुंबातील पूनम भोसले असे पॅनल करण्याची तयारी आहे. मात्र, अलीकडेच पक्षात दाखल झालेले बबलू शेलार, गणेश मोरे, सुवर्णा सचिन मोरे, सोनाली निखील पवार यांची दावेदारी आहे. तर दुसरीकडे उद्धवसेनेचे संजय चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांची पत्नी मयुरी, काँग्रेसच्या वत्सला खैरे अशी तयारी आहे. भाजपतील नाराज मोरे यांना उद्धवसेना गळाला लावण्याची शक्यता आहे. कदाचित राष्ट्रवादी (शरद पवार) शहराध्यक्ष गजानन शेलार देखील या प्रभाग १३ मधून लढू शकतात. त्यामुळे हा प्रभाग सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे.