Nashik Municipal Corporation Election : भाजपच वरचढ; मात्र उमेदवारी डावलली तर बंडखोर ठरतील डोईजड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:53 IST2025-12-26T14:53:14+5:302025-12-26T14:53:47+5:30

शिंदेसेनेबरोबरच राष्ट्रवादीशी युती झाल्यास जेमतेम जागा मिळण्याची शक्यता

Nashik Municipal Corporation Election: BJP is ahead; But if the candidature is rejected, Doijad will become a rebel | Nashik Municipal Corporation Election : भाजपच वरचढ; मात्र उमेदवारी डावलली तर बंडखोर ठरतील डोईजड

Nashik Municipal Corporation Election : भाजपच वरचढ; मात्र उमेदवारी डावलली तर बंडखोर ठरतील डोईजड

संदीप झिरवाळ 
लोकमत न्यूज नेटवर्क

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळा नगरी, उच्चभ्रू तर मध्यमवर्गीय वसाहत, मळे परिसर, गावठाण, कष्टकरी, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या पंचवटीत गेल्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याने २४ पैकी १९ जागा जिंकून भाजपनेच वर्चस्व सिद्ध केले होते.

यंदा पंचवटीत भाजपचा वरचष्मा असला तरी ६ प्रभागातील २४ जागांसाठी भाजपकडून २०० इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली असून, त्यात कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, अन्य पक्षातून पक्षांतर करत भाजपत दाखल झालेल्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. राज्यात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) ही महायुती असल्याने भाजपकडून स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी स्वतंत्र लढावे अशीच मागणी असल्याने तसे पक्षश्रेष्ठींकडे कळवण्यात आले आहे. सध्या तरी महायुती होणार नसल्याचे संकेत भाजपने दिले आहे. त्यामुळे पंचवटीत भाजप विरुद्ध शिंदेंसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) व महाविकास आघाडी लढत होईल, असा अंदाज आहे.

गतवेळी ६ प्रभागात भाजपने २४ उमेदवार उभे केले होते. त्यात भाजप १९, शिवसेना १, मनसे २, अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते, मात्र काही प्रभागात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे दुसऱ्या क्रमांकावर होती. आता भाजप स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याने भाजप, शिंदेंसेना व महाविकास आघाडी यांच्यात लढत होईल हे चित्र दिसत आहे.

प्रभाग १ मधून रंजना भानसी, गणेश गिते, अरुण पवार आणि पूनम धनगर हे निवडून आले होते. धनगर येथे नसल्या तरी भाजपकडे दावेदार मात्र भरपूर आहेत. प्रभाग ३ मध्ये रुची कुंभारकर, प्रियांका माने, मच्छिंद्र सानप हे तिघे भाजप, तर पूनम मोगरे शिंदेसेनेचे आहेत. तेथे युती झाल्याच भाजपला एकाचा पत्ता कापावा लागेल. जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, शांताबाई हिरे हे चौघे माजी नगरसेवक असून, शांताबाई हिरे यांचे निधन झाल्याने यांच्या सून मोनिका हिरे या दावेदार आहेत. त्यामुळे या प्रभागातील काही शिंदेसेनेला मिळण्याची शक्यता नाही. प्रभाग दोनमध्येही वेगळी स्थिती आहे. प्रभाग ५ मध्ये गतवेळी अपक्ष निवडून आलेले माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, मनसेच्या नंदिनी बोडके, स्व. पाटील यांचे पुत्र नरेश पाटील भाजपत आल्याने भाजपतील इच्छुक अस्वस्थ असून, काही इच्छुकांनी आत्ताच शिंदेसेनेत सूत जुळवण्याची तयारी केली आहे. या प्रभागातून प्रभाग ५ मध्ये कमलेश बोडके हे भाजपचे एकमेव निवडून आले होते. त्यांना उमेदवारी मिळणार किंवा नाही या भाजपतच वादाचा विषय आहे. प्रभाग ६ मध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी भाजपत प्रवेश केल्याने मनसेची जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

विद्यमानांचा पत्ता कापणार?

राष्ट्रवादीने (अजित पवार) आघाडी करण्याचे ठरवल्यास पंचवटीत कविता कर्डक, अंबादास खैरे आणि समाधान जाधव या प्रमुख दावेदारांसाठी भाजप आपल्या विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कापणार काय हा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपची युती झाली तरी शिंदेसेनेशी होऊ शकेल असे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीची अवस्था एकदमच बिकट असून, अशावेळी युती केल्यास पक्षाचे अस्तित्व म्हणून तरी निवडणुका लढवू शकेल.

Web Title: Nashik Municipal Corporation Election: BJP is ahead; But if the candidature is rejected, Doijad will become a rebel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.