भाजप विरुद्ध मित्रपक्ष विरुद्ध मविआ तिरंगी लढत : महायुती फुटली, शिंदेसेना-राष्ट्रवादी युतीवर अखेर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:01 IST2025-12-30T15:01:09+5:302025-12-30T15:01:40+5:30
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अखेरीस भाजप स्वबळावर लढणार असून मित्रपक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत देणार आहे.

भाजप विरुद्ध मित्रपक्ष विरुद्ध मविआ तिरंगी लढत : महायुती फुटली, शिंदेसेना-राष्ट्रवादी युतीवर अखेर शिक्कामोर्तब
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अखेरीस भाजप स्वबळावर लढणार असून मित्रपक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत देणार आहे. भाजपाने स्वबळाची घोषणा केली नसती तरी तसे वातावरण निर्माण केल्याने मित्र पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे ठरविले. त्यामुळे आता तिरंगी लढत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) युतीच्या घोषणेवर अखेर सोमवारी (दि.२९) सायंकाळी शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपविरोधातील या अनोख्या युतीमध्ये 'इलेक्टोरल मेरीट' अर्थात निवडून येण्याच्या क्षमतेनुसारच उमेदवारनिश्चिती करण्यात येणार असली तरी शिंदेसेनाच मोठा भाऊ राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. युतीमधील जागांच्या निश्चित आकड्यावर रात्री उशिरापर्यंत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शिंदेसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर केले.
राज्यात सत्तेत सहभागी असल्याने भाजपकडून गत पंधरवड्यापासून चर्चेसाठीही निमंत्रण न मिळाल्याने गत चार दिवसांपासून शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) कडून चर्चेला प्रारंभ करण्यात आला होता, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारचा एकमेव दिवस बाकी असूनही कोणताही प्रस्ताव आला नसल्याने शिंदेसेनेसह राष्ट्रवादीची युती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी, भाजपने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून कदाचित आमच्याशी चर्चा केली नसेल, किंवा आम्ही समवेत असलो नसलो तरी फरक पडणार नाही, असे वाटल्याने भाजपने चर्चाच केली नसल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. शिंदेसेनेतर्फे विजय करंजकर यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा संदेश जाऊ नये, म्हणून युती केल्याचे सांगितले. भाजपने दोन्ही पक्षांपैकी एकाशीही संपर्क साधला नसल्याचेही करंजकर यांनी नमूद केले.
मोठा भाऊ शिंदेसेनाच
मनपा निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागतो, त्यामुळेच शिंदेसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले. जागांबाबत अजून चर्चा सुरू असली तरी शिंदेसेनाच मोठा भाऊ असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.
मविआसह मनसेचे समीकरण जुळले!
उद्धवसेना ६०, मनसे ३०, काँग्रेस १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १६ जागांचा फॉर्म्युला
नाशिक : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चानंतर सोमवारी (दि. २९) मविआतील घटक पक्षांच्या जागावाटपावर साधारण सर्वसंमती झाली आहे. त्यानुसार उद्धवसेना ६० जागा, मनसे ३० जागा, काँग्रेस १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १६ अशा फॉर्म्युलावर सर्वसहमती झाल्याचे संकेत मविआच्या नेत्यांनी दिले. मात्र, १३ आणि १४ या प्रभागांबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु असल्याने अंतिम जागावाटप आज होईल.
"आघाडीबाबत निर्णय झाला असला तरी काही जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. आमच्या पक्षाला ६० जागा, मनसेला २८ ते ३० जागा, तर काँग्रेस व राष्ट्रवादीला (शरद पवार) प्रत्येकी १५ ते १६ जागा अशी चर्चा झाली आहे." - दत्ता गायकवाड, उपनेता, उद्धवसेना