भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून झाडाझडती : 'बड्या' नेत्यांना पत्र देणारा तो 'शिलेदार' कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:36 IST2026-01-06T14:34:56+5:302026-01-06T14:36:14+5:30
Nashik Municipal Corporation Election 2026 : परस्पर फॉर्म वाटपाची 'उलटतपासणी'

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून झाडाझडती : 'बड्या' नेत्यांना पत्र देणारा तो 'शिलेदार' कोण?
नाशिक : गेल्या आठवड्यात विल्होळी येथे फार्म हाउसवर रंगलेल्या एबी फॉर्म नाट्याची दखल भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. नाशिकला आलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या काही जणांकडून फॉर्म वाटप कुठून कसे झाले याची उलट तपासणी सुरू केली. बड्या नेत्यांना फॉर्म कोणत्या शिलेदाराने आणि कोणाच्या सांगण्यावरून दिले याचीदेखील त्यांनी माहिती घेतल्याचे वृत्त आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच पक्षात अशाप्रकारची नामुष्की आल्याने अत्यंत दुरगामी परिणाम होतील अशाप्रकारच्या कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.
गेल्या आठवड्यात भाजप उमेदवारांचे एबी फॉर्म देण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. विल्होळी येथील फॉर्म हाउसवर एबी फॉर्मवरून झटापट झाली तसेच आमदार सीमा हिरे यांनी एका मोटारीचा पाठलाग करून फॉर्म ताब्यात घेतले होते. पक्षाचे एबी फॉर्म अगोदर काहींना मिळाले, त्या प्रभागातील उमेदवार नंतर घोषित झाले. ज्यांना उमेदवारी घोषितच झालेली नव्हती. त्यांना एबी फॉर्म अगोदर मिळाले आणि ज्यांना उमेदवारी अधिकृतरीत्या घोषित झाली. त्यांना विलंबाने उमेदवारी अर्ज मिळाल्याने त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. या सर्व प्रकरणानंतर रविवारी (दि. ४) नाशिकला आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचे एबी फॉर्म फार्म हाउसवरून का वाटले? पक्ष कार्यालयात इच्छुकाला बोलावून त्याची स्वाक्षरी घेऊन एबी फॉर्म देण्याची पद्धत असताना हा प्रकार कसा घडला, असा प्रश्न उपस्थित करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक भेटीत आमदारांसह पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. याबाबत सविस्तर माहिती घेत, ते रवाना झाले असले तरी निवडणुकीनंतर हे प्रकरण तापणार असल्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी सीमा हिरे यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक भेटीत कोअर कमिटीसह आमदार आणि प्रतिनिधींशी चर्चा केली.
रवींद्र चव्हाण यांची आमदार हिरेंशी चर्चा
नाशिकमध्ये रविवारी (दि. ४) रवींद्र चव्हाण यांचे आगमन झाल्यानंतर दोन तास त्यांनी आमदार सीमा हिरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. एबी फॉर्म वाटप प्रकरणात झालेल्या घटनेबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यामुळे आता चव्हाण वरिष्ठ नेतृत्वाकडे काय अहवाल देतात त्याची उत्सुकता आहे.
मनपा निवडणुकीनंतर संबंधितांना नोटिसा ?
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर एबी फॉर्म प्रकरणाची माहिती घेताना प्रामुख्याने उलट्या पद्धतीने तपासणी सुरू केली. संबंधित आता अधिकृत परंतु तेव्हा अनधिकृत असलेल्यांना एबी फॉर्म कोणी दिले. यात कोणा व्यावसायिकाचा संबंध आहे. अशाप्रकारे उलट पद्धतीने चौकशी सुरू केली. त्यानुसार शहराध्यक्ष आणि आमदारांना त्यांनी अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यांनी तो दिल्याचे वृत्त आहे. महापालिका निवडणूक संपल्यानंतर काहींना नोटीसदेखील बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांच्या अडचणीत वाढ होणार आहे.