शेवटच्या दिवशी मविआ अन् महायुतीत बंडखोरीचे फटाके; शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2024 10:00 IST2024-10-30T09:58:55+5:302024-10-30T10:00:30+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची जणू रांगच लागल्याचे चित्र दिसून आले.

शेवटच्या दिवशी मविआ अन् महायुतीत बंडखोरीचे फटाके; शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची जणू रांगच लागल्याचे चित्र मंगळवारी (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. नाशिक पूर्वमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते आणि पश्चिममधून उद्धवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले.
इगतपुरीमधील काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांनीही एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला. ३ वाजेच्या आत एबी फॉर्मसह शपथपत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असताना ३ वाजेला काही मिनिटांचा अवधी बाकी असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. त्यानंतर गणेश गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी पक्षासह अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली होती. शहरातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य, पश्चिम आणि देवळाली या ४ मतदारसंघांत तब्बल ६२ उमेदवारांनी ८६ अर्ज दाखल केले आहेत. नाशिक मध्य मतदारसंघासाठी १५ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल आहेत. नाशिक पश्चिममध्ये १३ उमेदवारांनी १७ अर्ज भरले. त्यात महाविकास आघाडीसह महायुतीच्या उमेदवारांनीही बंडखोरी करीत अर्ज दाखल केले आहेत. देवळाली मतदारसंघात १५ जणांनी २७ अर्ज आज भरले. नाशिक मध्य मतदारसंघात सर्वाधिक बंडखोर उमेदवार उभे आहेत.