जलकुंभाचे काम १० महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:57 IST2020-10-04T15:56:53+5:302020-10-04T15:57:32+5:30
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रीनव्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केली आहे.

जलकुंभाचे काम १० महिन्यांपासून बंद
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रीनव्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केली आहे.
१९८०-८१ साली तत्कालीन सरपंच शिवाजी निवृत्ती खुळे यांनी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविली. त्यासाठी १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला.जलकुंभाला लागलेली गळती पाहून ४.५ वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच सुनीता पोपट सैद व कर्मचारी सुरेश काहंडळ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले.त्यानंतर नवीन जलकुंभ मंजूर करायचा असल्याने शासनाने हा जलकुंभ निर्लेखित केला.तथापि, जलकुंभाचे काम सुरू झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत त्याचे बांधकाम पूर्ण होईल,अशी अपेक्षा असतांना गेल्या १० महिन्यांपासून ह्या जलकुंभाचे बांधकाम बंद आहे.ग्रामपंचायतने याबाबत संबंधित बांधकाम यंत्रणा पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र अद्यापही काम सुरू होऊ शकलेले नाही.सध्या जुना जलकुंभ अतिशय जीर्ण झाला असून त्याद्वारेच गावाची तहान भागविली जाते.ग्रामपंचायतकडे नळपाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी जलकुंभ नसल्याने जुना जलकुंभ लगेच पाडल्यास गावचा पाणी पुरवठा बंद होईल.काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याबरोबरच हे काम चांगल्या व अनुभवी ठेकेदाराकडे देण्यात यावे,अशी मागणी सुदेश खुळे यांनी केली आहे.
जलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांचेच...
'मी सरपंच असतांना सन १९८०-८१ साली नळपाणी पुरवठा योजना राबविली.त्यावेळी ह्या जलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांसाठी असेल असे सांगितले गेले.आजरोजी त्याला ४० वर्ष होत आहे.मात्र नवीन जलकुंभाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून जुन्या जलकुंभावरील भार कमी करावा.
शिवाजी खुळे, योजना राबविणारे तत्कालीन सरपंच
पाठपुरावा करूनही प्रतिसाद नाही
'जलकुंभाचे काम बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला आहे.मात्र जिल्हा परिषदेकडून आम्हांला उत्तरही मिळाले नाही आणि जलकुंभाचे कामही सुरू झाले नाही.
किशोर खुळे, माजी उपसरपंच