यंदा नाशकात चाळीस टक्के सार्वजनिक गणेशोत्सव; मौल्यवानसह लहान-मोठ्या मंडळांची संख्या घटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 20:57 IST2020-08-22T20:52:44+5:302020-08-22T20:57:08+5:30
गणेश मुर्ती आणि मंडपाचा आकार, आरतीसाठी उपस्थित लोकांची अट, कोरोनाची भिती यामुळे अनेकांनी गणेशमूर्ती विराजमान न करण्याचा निर्णय घेणे पसंत केले.

यंदा नाशकात चाळीस टक्के सार्वजनिक गणेशोत्सव; मौल्यवानसह लहान-मोठ्या मंडळांची संख्या घटली
नाशिक : शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षाच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या 60 टक्क्यांपर्यंत घटली आहे. कोरोनासंक्रमणाचा मोठा प्रभाव उत्सावावर पडल्याचे दिसत असून शासनाकडूनदेखील खबरदारी म्हणून विविध मर्यादा आखून देण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 40 टक्के सार्वजनिक मंडळांनी बाप्पांची प्रतिष्ठापना करत परंपरा जोपासली आहे.
कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप अगदी कमी झालेले दिसत आहे. शासनाकडून गणेशोत्सव काळात भक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेता विविध निर्बंध व मर्यादा घातल्या गेल्या आहेत. यावर्षी शहरात १५ मौल्यवान, ११५ मोठे आणि १६४ लहान मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. गतवर्षी शहरात एकूण ७१७ मंडळांनी नोंदणी केली होती. यंदा केवळ 294 मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बहुतांश मंडळाने घेतला आहे. त्यात अनेक छोट्या मंडळांनी गणेशोत्सवात थेट सहभाग घेण्याचे टाळले आहे. गतवर्षी शहरात ३९ मौल्यवान, १५८ मोठे आणि ५२० लहान गणेश मंडळांनी नोंदणी केली होती. तर सुमारे एक लाख घरगुती गणपती होते. मात्र यावर्षी मोठी घट झाली आहे.
गणेश मुर्ती आणि मंडपाचा आकार, आरतीसाठी उपस्थित लोकांची अट, कोरोनाची भिती यामुळे अनेकांनी गणेशमूर्ती विराजमान न करण्याचा निर्णय घेणे पसंत केले. शहरात कोरोना संक्रमण अधिक पसरत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शासकीय आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्रात सण-उत्सव साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाला सक्तीने नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले गेले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे शिस्तबद्धता आणि साधेपणा दिसत आहे. त्यामुळे काेरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी झाला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवर वाढणारा बंदोबस्ताचा ताणदेखील हलका झाला असून यंदा मिरवणुकाही कोरोनामुळे रद्द झाल्या आहेत.