The first MP got the taluka of Bharati Pawar | भारती पवार यांच्या रूपाने तालुक्याला मिळाला पहिला खासदार
भारती पवार यांच्या रूपाने तालुक्याला मिळाला पहिला खासदार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉ. भारती पवार यांनी बाजी मारली. या निवडणुकीचा निकाल कळवण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असून, माकपाचे उमेदवार आमदार जे. पी. गावित यांची उमेदवारी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांना अडचणीची ठरली. कळवण विधानसभा मतदारसंघातील अवघ्या हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या दळवट गावाने तालुक्याला स्व. ए.टी. पवारांच्या रूपाने ९ वेळा आमदार, ४ वेळा मंत्रिपद, तर जयश्री पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्हा परिषदेला पहिली आदिवासी महिला अध्यक्ष दिली आहे. त्याच पवार कुटुंबातील डॉ. भारती पवारांच्या रूपाने कळवण तालुक्याला पहिली खासदार व जिल्ह्याला पहिली महिला खासदार देण्याचा मान मिळवला आहे. खासदारकीच्या बाबतील सन १९५२ पासून कळवण तालुक्यावर सातत्याने अन्याय होत होता. कळवण तालुक्याने फक्त विजयी उमेदवारालाच आघाडी देण्याचे काम आजवर केले होते. मात्र लोकसभेची उमेदवारी मिळाली तरी विजयापर्यंत उमेदवार पोहोचत नव्हता. डॉ. भारती पवार यांच्या रूपाने प्रथमच तालुक्यातील तिºहळची कन्या व दळवटच्या सुनेने कळवण तालुक्याला खासदारकी मिळवून दिली असून, सन १९७१ मध्ये स्व. ए.टी. पवारांनी दिल्लीत जाण्याचे पाहिलेले स्वप्न तब्बल ४८ वर्षांनंतर स्नुषा डॉ. भारती पवारांमुळे पूर्ण झाले. अनेक विषयांवर भाजप सरकार विरोधात रान उठवूनदेखील या मतदारसंघात डॉ. भारती पवारांनी विजयश्री प्राप्त केल्याने राष्टÑवादीला चांगलीच चपराक बसली आहे. कळवणमधून राष्टÑवादी आणि सुरगाण्यात माकपा आघाडी घेईल हा विरोधकांचा होरा फोल ठरला. डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसने नाकारलेली उमेदवारी पथ्यावर पडली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने डॉ. भारती पवार भाजपमध्ये गेल्याने पवार कुटुंब दुभंगल्याची चर्चा होती. त्यामुळे नितीन पवारांबरोबर राजकारण करणारे प्रचारापासून दूर राहिले, तर आघाडीच्या काही नेत्यांनी डॉ. भारती पवारांचे समर्थन केल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. भाजपने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारून डॉ. भारती पवारांना दिली आणि कळवण विधानसभा मतदारसंघात बेरीज व वजाबाकीचे राजकारण भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.
४८ वर्षांनंतर झाले स्वप्न पूर्ण
सन १९७१ मध्ये काँग्रेस दुभंगल्यानंतर राष्ट्रपतींच्या सल्ल्याने काँग्रेसने फेब्रुवारीमध्ये १९७१ लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. कळवणचा समावेश मालेगाव मतदारसंघात असल्याने काँग्रेसने विद्यमान खासदार झेड. एम. काहांडोळ यांना उमेदवारी दिली, तर भारतीय क्र ांती दलाकडून स्व. ए. टी. पवार यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसने गरीब हटाव, तर विरोधकांनी इंदिरा हटावचा नारा दिला होता. इंदिरा गांधींच्या झंझावातापुढे विरोधकांचे पानिपत झाल्याने स्व. ए. टी. पवार पराभूत झाले. १९७१ मध्ये सासरे स्व. ए. टी. पवार यांचे दिल्ली गाठण्याचे स्वप्न २०१९ मध्ये स्नुषा डॉ. भारती पवारांनी ४८ वर्षांनी पूर्ण केले.


Web Title:  The first MP got the taluka of Bharati Pawar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.