"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 08:35 IST2026-01-12T08:34:47+5:302026-01-12T08:35:44+5:30
गोदावरीचे पाणी अंघोळीसह पिण्यायोग्य करण्याची दिली ग्वाही

"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
नाशिक : भाजप हा रामाला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे तपोवनाबाबत काळजी घेऊन ही जागा कायम खुली ठेवण्यात येईल. त्या ठिकाणी कोणताही व्यावसायिक प्रकल्प उभारणार नाही. सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीचे पाणी इतके शुध्द करू की त्यात अंघोळ करता येईलच, परंतु ते पिताही येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी गोदाकाठी झालेल्या सभेत ते बोलत होते
तपोवनात साधुग्रामसाठी वृक्षतोडीचा मुद्दा राज्यात गाजत असताना फडणवीस यांनी गुगल इमेजेस दाखवित याबाबत होत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात केलेल्या टीकेला उत्तर देताना २०१६ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना तपोवनातील जागेचा वापर ११ वर्षे प्रदर्शनांसाठी करण्याचा ठराव नाशिक महापालिकेच्या महासभेत केल्याचे कागदपत्रही फडणवीस यांनी यावेळी दाखविले.
अकबराच्या कित्येक पिढ्यांआधी कुंभाचे स्नान सुरू झाले
काल परवा दोन भाऊ नाशिकला येऊन गेले, परंतु त्यांना रामाची आठवण झाली नाही., अशी उध्दव आणि राज यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, जो रामाचा नाही, तो कामाचा नाही. काही लोक देवाची खिल्ली उडवतात. डाव्या लोकांनी येथे आंदोलन करताना कुंभाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
अकबराने कुंभ सुरू केला असे ते सांगतात. मात्र, अकबराच्या कित्येक पिढ्यांआधी कुंभाचे स्नान सुरू झाले होते असे सांगत, कुंभ हा केवळ उत्सव नसून आपल्या संस्कृतीचे दर्शन आहे, कोणी कितीही टीका केली तरी कुंभ बंद पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात विरोधी पक्षनेता असताना आपण राज्यभर दौरा करत होतो. मात्र, हे सत्ता असताना घरात बसून होते, अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली.
लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत
'लाडकी बहीण' योजनेच्या अनुषंगानेही राजकीय वाद निर्माण झाला आहे. येत्या डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून सुमारे ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मतदानाआधीच ही रक्कम मिळाल्यास महिला लाभार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप घेत काँग्रेसने आयोगाकडे पत्र दिले आहे. मात्र, फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, ही योजना आधीपासूनच सुरू आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नाही. कितीही पत्रे दिली तरी लाडक्या बहिर्णीचे पैसे थांबणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी महिलांना दिली. ते मुंबईत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्या भाषणांचा मोठा हिस्सा हा राज्याच्या प्रगतीवर असतो. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासावर काय भाष्य केले ते दाखवावे. त्यांनी विकासावर एक वाक्य जरी उच्चारले तरी मी त्यांना ५,००० रुपये देईन, असे प्रति-आव्हानच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.