जे केले ते जनतेचे प्राण वाचवण्यासाठी मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपावर डॉ. रवींद्र चौधरी यांचे प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 15:10 IST2021-04-20T15:07:00+5:302021-04-20T15:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खानदेशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी ...

जे केले ते जनतेचे प्राण वाचवण्यासाठी मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपावर डॉ. रवींद्र चौधरी यांचे प्रत्युत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार:कोरोनामुळे प्रशासन, जनता हवालदिल झाली आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने खानदेशच्या जनतेच्या हितासाठी प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करून कमी दरात रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवले.
मंत्र्यांना हा गुन्हा वाटत असेल तर आम्ही गुन्हा केला फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठीच असे प्रतिउत्तर हिरा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिले.
मंत्री नवाब मलिक यांनी नंदुरबार हिरा ग्रुप मार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असून हॉटेल हिरा पॅलेस मध्ये इंजेक्शनचा मोठा साठा असल्याचा आरोप मंगळवारी केला. या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर हिरा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. रवींद्र चौधरी व माजी आमदार शिरीश चौधरी यांनी सांगितले की,गेल्या वर्षापासून कोरोनामुळे राज्यात,जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधांचा अभावाने परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे. काही घरातील कर्ते पुरुष गेले आहे आणि काही जात आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
परदेशात निर्यात होणारे रेमडीसीवर इंजेक्शन आपल्या भागातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सेवा म्हणून इंजेक्शन उपलब्ध करून दिले.हे इंजेक्शन स्वतः तोटा सहन करत साडे आठशे, नऊशे,पंधराशे रुपये अश्या भावाने दिले. बाजारभावात त्याचे मूल्य अधिक असताना हिरा ग्रुपने स्वतःचे पंचवीस ते तीस लाखांचा खर्च करून पदरमोड केले. त्यामुळे काळा बाजारचा प्रश्नच उद्भवत नाही.
त्याला जनता, प्रशासन साक्षीला आहे.त्यामुळे आम्ही शासनाचा कर बुडवला नाही किंवा फसवणूक केली नाही त्यामुळे मंत्र्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व राजकीय हेतूने प्रेरित आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर रूग्णांची सेवा करण्याची आहे असे स्पष्ट केले.