विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: May 21, 2023 19:51 IST2023-05-21T19:50:11+5:302023-05-21T19:51:29+5:30

सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

six year old girl died due to electric shock | विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मनोज शेलार, नंदुरबार : वडाळी, ता. शहादा येथे स्वाती सतीश जगताप (वय ६) या चिमुकलीचा लोंबकळलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नेहमी घरातच राहणारी स्वाती शनिवारी आतेभाऊ व बहिणीसह घराच्या छतावर खेळत होती. त्यावेळी खेळता खेळता एका उच्च दाब असलेल्या विद्युत तारेला स्वातीचा चुकून स्पर्श झाला. त्यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यामुळे ती गंभीर जखमी झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य केंद्रात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला. स्वातीचे वडील सतीश तुकाराम जगताप हे पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. स्वातीच्या पश्चात आई, वडील, आजी, काका, काकू आणि एक बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वडाळीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहिदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सारंगखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: six year old girl died due to electric shock