शेतातील झोपडीला आग लागून एकाचा होरपळून मृत्यू
By मनोज शेलार | Updated: February 19, 2024 19:37 IST2024-02-19T19:36:29+5:302024-02-19T19:37:06+5:30
विसरवाडी पोलीस ठाण्यात मधुकर छगन गावित यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेतातील झोपडीला आग लागून एकाचा होरपळून मृत्यू
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील बालमराई गावाच्या शिवारात शेतातील झोपडीला आग लागून एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत विसरवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद प्रभाकर गावित (४४) रा. जुनी विसरवाडी ता. नवापूर असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. प्रमोद गावित यांचे बालआमराई गावाच्या शिवारात शेत आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या पूर्वी या शेतात असलेल्या झोपडीत इलेक्ट्रिक बोर्डात शॉर्टसर्किट झाले. त्यात झोपडीला आग लागली. काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगीतून प्रमोद गावित यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या झोपडीच्या दरवाज्याला आतून कडी लागलेली होती. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात मधुकर छगन गावित यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, उपनिरीक्षक किरण पाटील हे करीत आहेत.