गॅस सिलिंडरची हेराफेरी; १३ सिलिंडर जप्त, दोघांवर गुन्हा
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 2, 2023 19:45 IST2023-04-02T19:44:53+5:302023-04-02T19:45:03+5:30
नंदुरबारातील गुड्डी गॅस रिपेअरिंग तसेच संदीपान मेडिकल स्टोअर्सच्या गाळ्यात विनापरवानगी सिलिंडरमधून गॅस काढून ते दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरत असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलिसांना मिळाली होती.

गॅस सिलिंडरची हेराफेरी; १३ सिलिंडर जप्त, दोघांवर गुन्हा
मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : गॅस सिलिंडरची हेराफेरी करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १३ सिलिंडर जप्त करण्यात आले. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिन वाहिद मन्सुरी (४२, रा. पटेलवाडी) व कलिम सलीम बागवान (४३, रा. बागवान गल्ली, नंदुरबार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नंदुरबारातील गुड्डी गॅस रिपेअरिंग तसेच संदीपान मेडिकल स्टोअर्सच्या गाळ्यात विनापरवानगी सिलिंडरमधून गॅस काढून ते दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरत असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी चौकशीच्या सूचना दिल्या. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी तपासणी केली असता एकूण १३ गॅस सिलिंडर आढळून आले. याशिवाय दोन इलेक्ट्रिक मोटरीही आढळून आल्या. त्याद्वारे ते एका सिलिंडरमधील गॅस दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस कर्मचारी योगेश जाधव यांनी फिर्याद दिल्याने अमिन मन्सुरी व कलिम बागवान यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर करीत आहेत.