नंदुरबारात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: April 27, 2023 18:49 IST2023-04-27T18:48:59+5:302023-04-27T18:49:14+5:30
नंदुरबार, शहादा, नवापूर व अक्कलकुवा या चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान होत असून नंदुरबार व नवापुरात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत रंगणार आहे.

नंदुरबारात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान
नंदुरबार: जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर व अक्कलकुवा या चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान होत असून नंदुरबार व नवापुरात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत रंगणार आहे. जिल्ह्यातील सहापैकी धडगाव व तळोदा या दोन बाजार समित्या यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर अक्कलकुव्यात १७ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्याने तेथे केवळ दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. इतर ठिकाणी मात्र निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे. प्रचार काळात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे.
विशेष म्हणजे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून सर्व ठिकाणी पॅनल उभे केल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. शहाद्यात भाजपमध्येच फुटीचे चित्र असून तीनपैकी दोन पॅनल भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आहेत. तर तेथे अभिजित पाटील यांनीही आपले पॅनल उभे केले आहे. याशिवाय महाविकास आघाडीने एकत्र येऊन ११ उमेदवार दिले आहेत. त्यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. नंदुरबारमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेना (शिंदे गट) व भाजप पुरस्कृत पॅनलमध्येच सरळ लढत होत आहे. नवापूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत पॅनल व भाजप पुरस्कृत यांच्यात लढत आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.