नांदेड महापालिकेच्या रणसंग्रामात भाजपचे तीन आमदार सक्रिय, दोघे अद्याप प्रचारापासून दूरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:43 IST2026-01-09T19:42:58+5:302026-01-09T19:43:51+5:30
महापालिका रणसंग्राम : भाजपकडून नेत्यांना प्रभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित

नांदेड महापालिकेच्या रणसंग्रामात भाजपचे तीन आमदार सक्रिय, दोघे अद्याप प्रचारापासून दूरच
नांदेड : महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले आहे. ग्रामीण भागात भाजपचे पाच आमदार असून त्यापैकी केवळ तिघांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना मात्र दोन आमदार प्रचारापासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांना एक वर्ग शहरात आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची महायुती न झाल्याने सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट शंभर टक्के राहिला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र त्याचा लाभ होताना दिसत नाही. नगरपालिका निवडणुकीतील अपयशानंतर सर्वच आमदारांनी सक्रिय होणे अपेक्षित होते; परंतु महापालिका निवडणुकीत पुन्हा अंतर्गत गटबाजी पाहायला मिळत आहे. आजघडीला भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड आणि देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर हे थेट प्रचारात सक्रिय आहेत. रॅली, कॉर्नर सभा, बैठका आणि मतदारांशी थेट संवाद साधत हे तिन्ही आमदार भाजप उमेदवारांसाठी ताकद लावताना दिसत आहेत.
मात्र, किनवटचे आमदार भीमराव केराम आणि आमदार राजेश पवार हे महापालिका प्रचारापासून दूर आहेत.
दोघांनाही कोणतीही प्रचाराची जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते आपापल्या मतदारसंघातच व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे नांदेड शहरात या दोन्ही आमदारांना मानणारा मतदार आहे. एका बाजूला शिंदेसेनेत अपक्ष उमेदवारांच्या प्रचारावरून अंतर्गत संघर्ष सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला भाजपमधील आमदारांची एकजूटही प्रश्नांकित ठरत आहे.
केराम, पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
नगरपालिका निवडणुकीत आमदार भीमराव केराम आणि आमदार राजेश पवार यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामागे भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत ठरल्याची चर्चा होती. मात्र, नांदेड शहरात आदिवासी मतदारांची संख्या मोठी असल्याने आमदार केराम यांची भूमिका महत्त्वाची आहे.
त्याचप्रमाणे मराठा समाजातील एक वर्ग आमदार पवार यांना मानतो. अशा स्थितीत या दोन्ही आमदारांची प्रचारातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी सर्व आमदारांची वज्रमूठ बांधणे गरजेचे आहे.
आ. श्रीजया चव्हाण वेधताहेत लक्ष
भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण या सध्या भाजपच्या प्रचारात सर्वांचे लक्ष वेधत आहेत. रॅली, संवाद बैठका आणि घराघरात जाऊन त्या मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. विशेषतः वयस्क महिला मतदारांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी भावनिक नाळ जोडली आहे. त्याचबरोबर युवकांची मोठी उपस्थिती दाखवत रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनही सुरू आहे.