नांदेडमध्ये शिंदेसेनेला धक्का; ऐनवेळी दोघांची माघार, आमदार कल्याणकर भाजपवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:53 IST2026-01-03T12:52:34+5:302026-01-03T12:53:03+5:30
महापालिका रणधुमाळी : ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार रिंगणात; ३७६ जणांची माघार, अपक्षांना शनिवारी चिन्ह

नांदेडमध्ये शिंदेसेनेला धक्का; ऐनवेळी दोघांची माघार, आमदार कल्याणकर भाजपवर संतापले
नांदेड : महापालिका निवडणुकीत उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली घडल्या. शिंदेसेनेच्या दोन अधिकृत उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. भाजपकडून सेनेला हा धक्का असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी त्या उमेदवारांच्या जागी नव्या उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले. तर यावरून संताप व्यक्त करत कल्याणकर यांनी भाजपने उमेदवार पळवल्याचा आरोप केला. आता ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
शुक्रवारी उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी शहरात राजकीय नाट्य पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक ५ अ मधील शिंदेसेनेचे उमेदवार महेंद्र पिंपळे आणि प्रभाग क्रमांक १० ब मधील वंदना मनोज जाधव यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष म्हणजे, महेंद्र पिंपळे हे काही दिवसांपूर्वीच भाजपमधून सेनेत दाखल झाले होते. सेनेचा एबी फॉर्म मिळवत उमेदवारी मिळविली अन् पुन्हा माघार घेत भाजपमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, शिंदेसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक ५ अ साठी मिनाक्षी रमेशराव धनजकर आणि प्रभाग क्रमांक १० ब साठी दिपाली हिरामन थोरवट यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले.
प्रभागांतील ८१ जागांसाठी तब्बल १२०३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. छाननी प्रक्रियेत ५९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर ८७८ इच्छुकांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १ आणि २ जानेवारी असे दोन दिवस निश्चितकेले होते. या कालावधीत एकूण ३७६ उमेदवारांनी माघार घेतली असून आता निवडणूक रिंगणात ४९१ उमेदवार उरले आहेत.
अपक्षांची 'दिवाळी'
या निवडणुकीत मोठ्या संख्येने अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतविभाजन टाळण्यासाठी या अपक्षांची मनधरणी करताना नाकीनऊ आले असले तरी या मंडळींची मात्र दिवाळी झाल्याची चर्चा होती.
नाट्यमय घडामोडीनंतर बंडोबा झाले थंड; अनेकांची माघार
अनुकूल उमेदवार निवडणुकीत टिकवून ठेवण्यासाठी आणि अडचणीचे उमेदवार माघार घेतील यासाठी नेत्यांना कसरत करावी लागली. या प्रक्रियेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. मात्र पक्षाकडून समजूत काढल्यानंतर या बंडखोरांनी 'विकासासाठी' माघार घेत असल्याचे सांगत उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अनेक प्रभागांतील चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी थेट लढती तर काही ठिकाणी बहुरंगी सामना रंगणार आहे.
बंडखोरांना थंड करण्यासाठी आश्वासनांची खैरात
पक्षाकडून तिकिट न मिळाल्यामुळे अनेकांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. गेल्या दोन दिवसात या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीनेत्यांनी वेगवेगळी आश्वासने दिली. त्यात काहींना पक्षात पदेही देण्यात आली. अॅड. दिलीप ठाकूर आणि त्यांच्या पत्नीन अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या शिफारशीवरुन ठाकूर यांना महानगर जिल्हा सरचिटणीस पद देण्यात आले. त्यामुळे ठाकूर दांम्पत्याने उमेदवारी मागे घेतली. तर काही जणांना पक्षात मानाचे स्थान देण्यात येईल. तसेच भविष्यात विचार करण्यात येईल, असे आश्वासन देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले.
प्रभागनिहाय माघारी घेतलेले उमेदवार
प्रभाग १- २२, प्रभाग २- १४, प्रभाग ३- २२, प्रभाग ४- १९, प्रभाग ५- ४०
प्रभाग ६- २४, प्रभाग ७- १७, प्रभाग ८- ३५, प्रभाग ९- ६३, प्रभाग १०- १७
प्रभाग ११- ०६, प्रभाग १२- ०४, प्रभाग १३- १३, प्रभाग १४- १९, प्रभाग १५- २८
प्रभाग १६- २१, प्रभाग १७- १२, प्रभाग १८- १३, प्रभाग १९- १७, प्रभाग २०- ३६