पक्ष बदलला, नेतृत्व कायम : नांदेडकरांची पुन्हा अशोकरावांना साथ, प्रथमच होणार भाजपचा महापौर
By श्रीनिवास भोसले | Updated: January 17, 2026 18:31 IST2026-01-17T18:29:11+5:302026-01-17T18:31:28+5:30
भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोकराव चव्हाण यांनी जुने काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपचे निष्ठावंत यांची एकत्रित मोट बांधली.

पक्ष बदलला, नेतृत्व कायम : नांदेडकरांची पुन्हा अशोकरावांना साथ, प्रथमच होणार भाजपचा महापौर
- श्रीनिवास भोसले
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपचे 'कमळ' हाती घेतल्याने नांदेडच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ‘नेतृत्व बदलेल का, की जनता पक्षनिष्ठ राहील?’ असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांच्या निकालांनीच त्याचे उत्तर दिले. पक्ष बदलला असला, तरी नेतृत्व तेच या भावनेतून नांदेडकरांनी पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण यांनाच साथ दिली आहे.
अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आजवर काँग्रेसचा वरचष्मा राहिला. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत चव्हाण यांचे नेतृत्व निर्णायक ठरले. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अशोकरावांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निर्णयावर सुरुवातीला टीका झाली; मात्र, विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायत आणि आता महापालिका निवडणूक निकालांनी अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोकराव चव्हाण यांनी जुने काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपचे निष्ठावंत यांची एकत्रित मोट बांधली. खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह काही जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही अशोकरावांचे नेतृत्व मान्य करत एकत्र काम केले. याचा परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यात भाजप प्रथमच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा शंभर टक्के स्ट्राइक रेट राहिला. त्यानंतर झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्येही भाजपने बाजी मारली. जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक ७४ नगरसेवक निवडून आले. याशिवाय, अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्या मराठवाडा जनहित पार्टीचे ३३ नगरसेवक निवडून येणे हे त्यांच्याच प्रभावाचे द्योतक ठरले. भोकर, मुदखेड, कुंडलवाडी येथे भाजपला, तर बिलोली व धर्माबाद येथे स्थानिक विकास आघाडीला नगराध्यक्षपदावर यश मिळाले.
महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले
आठ वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. परंतु, नांदेड शहरात राहणाऱ्या जनतेनेदेखील अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपला साथ दिली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे स्पष्ट बहुमत आले. यापूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्वाधिक काळ मनपा काँग्रेसची सत्ता राहिली आहे. आजघडीला एकूण ८१ पैकी भाजपाला ४५ जागांवर यश मिळाले. त्याचबरोबर एमआयएमला १४, काँग्रेस - १०, शिंदेसेना - ४, वंचित बहुजन आघाडी ५, राष्ट्रवादी (अजित पवार) २ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.
असा राहिला पक्षनिहाय स्ट्राईकरेट
भाजपने एकूण ६६ उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी ४५ जणांना यश मिळाले. राष्ट्रवादी ५३ पैकी २, काँग्रेस ५४ पैकी १०, वंचित बहुजन आघाडी १८ पैकी ५, एमआयएमचे ३७ पैकी १४ तर शिंदे सेनेच्या ६३ पैकी ४ उमेदवारांचा विजय झाला.