नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

By श्रीनिवास भोसले | Published: April 26, 2024 11:04 AM2024-04-26T11:04:23+5:302024-04-26T11:04:55+5:30

पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांसह १०० वर्षीय आजीबाईंनीही केले मतदान

Enthusiasm of women including senior citizens to vote in Nanded; 7.73 percent polling till 9 am | नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात असलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान झाले आहे. पहाटेपासूनच ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह दिसत आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ असून आज २ हजार ६८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकूण १८ लाख ५१ हजार ८४३ मतदार आज आपला हक्क बजावणार आहेत.  सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थिती लावली आहे. वजीराबाद येथील महिला सखी केंद्रावर गुलाब पुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे.

नांदेड ग्रामीण भागातही मतदान उत्‍साहात सुरु झाले असून अनेक बुथवर मतदारांच्‍या रांगा दिसून आल्‍या आहेत. नांदेड शहरी व ग्रामीणमध्‍ये वयोवृध्‍द तसेच नवमतदारासह सर्व गटातील मतदारामध्‍ये मतदान करण्‍याचा उत्‍साह दिसून येत आहे. नांदेड लोकसभा मतदार संघातील नांदेड दक्षिण मध्‍ये सकाळी ९ वाजेपर्यत  सर्वाधिक १०.५ टक्‍के मतदान झाले असून सर्वात कमी मुखेड येथे ५.२ टक्‍के मतदान झाले आहे. भोकर ६.४५ टक्‍के, नांदेड उत्‍तर ७.९७ टक्‍के, नांदेड दक्षिण १०.०५ टक्‍के तर नायगाव ९.१७ टक्‍के आणि  देगलूर  ६.९ टक्‍के, मुखेड ५.२ टक्‍के मतदान झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह १०० वर्षीय आजीबाईंनीही केले मतदान
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या नजीक असणाऱ्या कामगार कल्याण केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर हबीबाबी (वय १००) वर्ष यांनी नवीन हसापुर वाघीरोड नांदेड येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्र प्रथम असे स्लोगन देत नव मतदारांनी देखील मतदानासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीनुसार सर्व नागरिकांनी मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Enthusiasm of women including senior citizens to vote in Nanded; 7.73 percent polling till 9 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.