काँग्रेसकडून संविधान बदलण्याचा अपप्रचार, त्यांना धडा शिकविण्याची वेळ आलीय: अशोकराव चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:09 IST2026-01-10T16:55:57+5:302026-01-10T17:09:44+5:30
काँग्रेस संपण्याची गणती आता सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता उरलेला नाही.

काँग्रेसकडून संविधान बदलण्याचा अपप्रचार, त्यांना धडा शिकविण्याची वेळ आलीय: अशोकराव चव्हाण
नांदेड : भारतीय जनता पक्ष हा संविधानाला मानणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत प्रथम प्रवेश करताना संविधानासमोर नतमस्तक झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मान देऊनच भाजप सरकार काम करत आहे. मात्र, काँग्रेसकडून सातत्याने संविधान बदलण्याचा अपप्रचार केला जातोय. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली, असे प्रतिपादन खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
ते चौफाळा भागात आयोजित प्रचार सभेत बोलत होते. खा. चव्हाण म्हणाले, विरोधकांकडे कोणताही अजेंडा नसल्याने ऊठसूट माझ्यावर टीका करतात. काँग्रेस संपण्याची गणती आता सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता उरलेला नाही. भारतीय जनता पक्षाकडे विकासाचा अजेंडा असून भाजपच नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करेल. बारा बलुतेदार हे गेल्या अनेक पिढ्यांपासून आपले पारंपरिक व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवत असून त्यांचे बचत गट निर्माण होत आहेत. येणाऱ्या काळात लखपती दीदी बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून भाजप सरकार अधिकची रक्कम देणार आहे. जुन्या नांदेडातील विकासकामांना गती मिळणार असून चौफाळा भागातील प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावले जाणार आहेत. मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मतदानरूपी आशीर्वाद देऊन साथ दिल्यास निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची निश्चित पूर्तता केली जाईल, असे आश्वासनही खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिले. यावेळी चैतन्यबापू देशमुख, बाळू खोमणे, बाळासाहेब कांबळे, अंचन जोंधळे, शांताबाई कोमटवार, नागेश कोकुलवार, भालचंद्र पत्की आदींची उपस्थिती होती.