हिरकणी कक्ष नेहमी असतो कुलूपबंद, या बस स्थानकावर पोलिस चौकीचा तर पत्ताच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:14 IST2025-02-28T17:12:40+5:302025-02-28T17:14:04+5:30
Nagpur : कामठी बसस्थानकामध्ये दोनच सीसीटीव्ही

The Hirakni room is always locked, this bus station does not even have an address for the police post
सुदाम राखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यावरणी बस स्थानकावरील अरक्षेचा नागपूर जिल्ह्यातील वर्दळीच्या असलेल्या कामठी बसस्थानकावर गत वर्षभरापासून हिरकणी कक्ष बंद कुलूपबंद आहे तर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी लावलेले मशीन वर्षभरापासून बंद असल्याचे वास्तव 'लोकमत'च्या पाहणीत उघडकीस आले आहे.
या स्थानकावर दोनच सीसीटीव्ही असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात वाढ होणे गरजेचे आहे. अतिसंवेदनशील असलेल्या या स्थानकावर रात्री स्थानिक गुंडांचा वावर असल्याने येथे पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
कामठी बसस्थानकावरून मध्यप्रदेशातील सिवनी, सागर, मलाजखंड तर गोंदिया, तुमसर, भंडारा, रामटेक, सावनेर, कुही, नागपूर, पारशिवनीपर्यंत सकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत बसेस धावतात. येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते.
असे आहे वास्तवः गुंड, खिसेकापूंचाही वाढला आहे वावर
- बसस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी शेड निर्माण करण्यात आले आहेत पण मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रसंगी प्रवाशांना उन्हात ओट्यावर बसावे लागते.
- प्रवाशांना पाणी पिण्यासाठी मशीन लावली आहे पण तीही वर्षभरापासून बंद आहे. बाजूला असलेले कॅन्टीन (उपाहारगृह) दोन वर्षांपासून बंद आहे.
- त्यालाच लागून हिरकणी कक्ष आहे. तो नेहमी कुलूपबंद असल्यामुळे कोणत्याही प्रवासी महिलेला हिरकणी कक्षाचा लाभ घेता येत नाही. हिरकणी कक्ष हे बसस्थानक व्यवस्थापकाच्या कार्यालयापासून लांब आहे. हा कक्ष स्थापन करताना महिला प्रवाशांची अडचण विचारात घेण्यात आलेली नाही.
- बसस्थानक परिसराचे सिमेंट काँक्रीट न झाल्यामुळे बसेसमुळे मोठ्या प्रमाणात गिट्टी उखडलेली आहे. त्यामुळे येथे धुळीचे प्रमाण अधिक आहे.
- बसस्थानक परिसरातील पथदिवे नेहमीच बंद असतात. बसमध्ये प्रवासी चढत व उतरत असताना खिसे कापणाऱ्या चोरट्यांची संख्या अधिक आहे. त्यात महिला चोरट्यांचा समावेश आहे.
- रात्री १० नंतर कामठी बसस्थानकावर नागपूर शहरातील काही तडिपार गुंडाचा वावर असतो. कामठी बसस्थानकावर यापूर्वी दोन पोलिस कर्मचारी तैनात राहायचे पण गत पाच वर्षांपासून येथील पोलिस चौकी बंद आहे.