अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:24 IST2025-12-06T18:23:44+5:302025-12-06T18:24:50+5:30
Nagpur : येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर होतील. या हजारो कोटींच्या घरात राहणार असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच संपूर्ण अधिवेशनात ११ विधेयक सादर होतील.

Supplementary demands worth thousands of crores will be submitted on the first day of the session; Session to begin from December 8
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर होतील. या हजारो कोटींच्या घरात राहणार असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच संपूर्ण अधिवेशनात ११ विधेयक सादर होतील. यातील ६ अध्यादेश तर ५ नवीन विधेयके असणार असल्याचे सांगितले जाते.
हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सोमवार ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. बांधकाम विभागाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रस्ते चकाचक करण्यात आले असून मंत्र्यांसाठी नव्याने १६ दालनाचे कामही जवळपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. सचिवालयाच्या हाती सुरक्षा असून त्यांनीही आपले कामकाज सुरू केले आहे.
अधिवेशनाचे कामकाज सुरू करण्यास सचिवालयही सज्ज आहे. हे अधिवेशन फक्त ७ दिवसांचे असणार आहे. पहिल्यांदाच शनिवार व रविवारला सुटीच्या दिवशी कामकाज होणार आहे. त्यामुळे काही दिवस कामकाज रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत ११ विधेयके सादर होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यातील ६ हे अध्यादेश असून ते पटलावर ठेवण्यात येतील. तर ५ नवीन विधेयक सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
