रामटेक तालुक्यात डीएपी खताची टंचाई; शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:57 IST2025-06-09T17:56:28+5:302025-06-09T17:57:18+5:30
काळाबाजार होण्याची शक्यता : पर्यायी खते वापरण्याचा सल्ला

Shortage of DAP fertilizer in Ramtek taluka; Farmers advised to use alternative fertilizers
राहुल पेटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : यावर्षी पावसाला आधीच सुरुवात झाल्याने तसेच जमिनीत पुरेसी ओल असल्याने शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. रामटेक तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या डीएपी उपलब्ध नसल्याने या खताचा काळाबाजार होण्याची शक्यता बळावली आहे. डीएपीची रॅक उतरली नसल्याने तालुक्यात या खताची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा, असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.
रामटेक तालुक्यात धान व त्याखालोखाल कापसाचे पीक घेतले. तालुक्यात सरासरी ४,४३५ हेक्टरमध्ये कापसाची लागवड केली जाते. या पिकासाठी सुरुवातीला नत्र व स्फुरद या घटकांची आवश्यकता असल्याने तसेच डीएपीमध्ये ४६ टक्के स्फुरद व १८ टक्के नत्र असते. यात प्रोटिन्सयुक्त नत्र असल्याने सुरुवातीला रोपांची वाढ जोमात होते. त्यामुळे शेतकरी याच खताला फार पूर्वीपासून प्राधान्य देतात.
तालुक्यात किमान एक हजार मेट्रिक टन डीएपीची आवश्यकता असून, कृषी विभागाने त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला तर दुकानदारांनी कंपन्यांकडे मागणी नोंदविली आहे. डीएपीची रॅक अजूनपर्यंत उतरली नाही, त्यामुळे तालुक्यात डीएपीची कमतरता जाणवत आहे, अशी माहिती कृषी सेवा केंद्र मालकांनी दिली असून, कृषी विभागाने दुजोरा दिला आहे.
नफेखोरीसाठी खतांची टंचाई
हंगामात खतांची मागणी वाढत असल्याने अधिक मागणी असलेल्या खतांची मुद्दाम टंचाई निर्माण केली जाते. टंचाई निर्माण झाली ही दुकानदार चढ्या दराने खतांची विक्री करून नफा कमावतात. राज्य सरकार व कृषी विभाग खते व बियाण्यांचे लिंकिंग करू नका, असे वारंवार सांगत असले कृषी सेवा केंद्र मालक कुणाचेही ऐकत नाही. त्यांच्यावर जुजबी कारवाया केल्या जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, तातडीने पुरेसे डीएपी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
"शेतकऱ्यांनी पिकाला आवश्यक असलेले घटक विचारात घेऊन डीएपीला पर्यायी खते वापरावी. यासाठी २५ किलो युरिया व १५० किलो एसएसपी किंवा २५ किलो युरिया व ५० टीएसपी किंवा ३७किलो २४-२४-० व ८७ किलो एसएसपी अथवा ४५ किलो २०-२०-०-१३ व ८७ किलो एसएसपी किंवा १५-१५-१५, १६-१६-१६, १९-१९-१९ या खतासोबत एसएसपी वापरून डीएपीला पर्यायी खत म्हणून शेतकऱ्यांनी वापरावे."
- सुनील कोरटे, तालुका कृषी अधिकारी, रामटेक