पोलिंग पार्टी मतदान केंद्रांवर दाखल : २३ हजारावर कर्मचारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:10 IST2019-04-10T23:32:49+5:302019-04-11T00:10:05+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी सर्व पोलिंग पार्टी (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) आपापल्या साहित्यासह बुधवारीच आपापल्या मतदान केद्रांवर दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी मतदान केंद्र तयार केले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ने मतदानास सुरुवात होईल. सकाळी ७ वाजेपासून नियमित मतदानास सुरुवात होईल. ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.

मतदान केंद्राधिकाऱ्याला सूचना करताना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी सर्व पोलिंग पार्टी (मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी) आपापल्या साहित्यासह बुधवारीच आपापल्या मतदान केद्रांवर दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी मतदान केंद्र तयार केले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ने मतदानास सुरुवात होईल. सकाळी ७ वाजेपासून नियमित मतदानास सुरुवात होईल. ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.
बुधवारी सकाळपासूनच विधानसभानिहाय तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम पसिरात ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट आदींसह निवडणूक मतदानाचे साहित्य वितरित करण्यात आले. पोलिंग पार्टी आपापल्या मतदाननिहाय साहित्य घेऊन रवाना झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदान
मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत लागता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेत असलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतर कुणालाही मतदान करता येणार नाही.
जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम सुरक्षित पोहोचविणार
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कळमना येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील. या कंटेनरवर जीपीएस व्यवस्था असेल. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना या कंटेनरचा पाठलागही करता येऊ शकेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवल्या जातील, तिथे कुठलीही लाईव्ह वायरिंग राहू नये. त्यामुळे येथे कुठल्याही प्रकारची वायरिंग नाही. आतमध्ये सीसीटीव्ही नाही. परंतु परिसरात मात्र सीसीटीव्ही आहेत. तसेच कळमना येथील दोन्ही स्ट्राँग रूम हे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेने घेरलेले राहील.
कळमना येथे मतमोजणी
कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नागपूर व रामटेक या दोन्ही मतदार संघातील मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे दोन्ही मतदार संघासाठी दोन स्वतंत्र व्यवस्था आहे. कळमना येथील मतमोजणी केंद्राची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
एकूण मतदार
नागपूर : २१, ६०,२३२
रामटेक : १९,२१,०४७
एकूण मतदान केंद्र
नागपूर : २०५६
रामटेक : २३६४
एकूण कर्मचारी - दोन्ही मतदार संघात २३ हजार कर्मचारी
पोस्टल बॅलेट
दोन्ही मतदार संघात एकूण १९,५८० पोस्टल बॅलेट मतदार असून त्यापैकी रामटेक येथे १०,८४८ आणि नागपूरमध्ये ८,९३२ पोस्टल मतदार आहेत. या सर्वांना पोस्टल बॅलेट पाठवण्यात आलेले आहेत. निवडणूक विभागातर्फे निवडणूक कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्यासाठी सुविधा केंद्र उघडण्यात आले होते. यात १०१ लोकांनी मतदान केले. उर्वरित पोस्टल मतदाराला २३ मेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. परंतु २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत आपले पोस्टल मत संंबधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल, अशा पद्धतीने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल.
अशी आहे वाहन व्यवस्था
८०० जीप,५२० बसेस,१०० कार, १०० ट्रक,२४ कंटेनर ,२४ अॅम्बुलन्स आणि १३ अग्निशमन गाड्या