नागरिकांच्या पैशातून त्यांच्याच जीवाशी खेळ; कामठी ते न्यू कामठी उड्डाणपूल उद्घाटनापूर्वीच खचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:53 IST2025-07-24T12:52:23+5:302025-07-24T12:53:03+5:30
उद्घाटनापूर्वीच दिसला निकृष्ट बांधकामाचा नमुना : तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

Playing with citizens' lives with their money; Kamthi to New Kamthi flyover collapsed even before inauguration
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नुकत्याच उभारण्यात आलेल्या व उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामठी ते न्यू कामठीला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारच्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून, काही भाग खचल्याची धक्कादायक घटना घडली. निकृष्ट बांधकामामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या उड्डाणपुलावरून रहदारी सुरू झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने उद्घाटन न झाल्याने ती टळली आहे. मोठमोठे खड्डे पडलेल्या पुलाचा व्हिडीओ एका नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये पुलाचा काही भाग खोलवर बसलेला स्पष्ट दिसतो. यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विकासाच्या नावाखाली नागपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असली तरी निकृष्ट कामामुळे विकासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा पुढे आला आहे.. सार्वजनिक पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांमध्ये अशी अनियमितता होत असल्याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.
हा सार्वजनिक निधीचा अपव्ययच नाही, तर हा लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या पुलाचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याकडे शासनाने दुर्लक्षित केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. पायाभूत सुविधांच्या विकासकामात पारदर्शकता असावी मागणी होत आहे.
- कामठी ते न्यू कामठीला जोडणारा उडाणपूल उद्घाटनाआधीच खचला.
- पूल वापरात आला असता, मोठी दुर्घटना घडली असती, सुदैवाने ती टळली.
- नागरिकाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्यानंतर प्रकार उघडकीस
- तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिटची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी.