ट्रकची अॅक्टिव्हाला धडक; अपघातात माजी आमदाराच्या 'पीए'च्या पत्नीचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 14:36 IST2022-11-11T14:36:01+5:302022-11-11T14:36:15+5:30
नागपूर-भंडारा महामार्गावरी घटना

ट्रकची अॅक्टिव्हाला धडक; अपघातात माजी आमदाराच्या 'पीए'च्या पत्नीचा जागीच मृत्यू
मौदा : वेगात जाणाऱ्या ट्रकने माजी आमदार चरण वाघमारे यांचे स्वीय सहायक (पीए) विजय भुरे यांच्या अॅक्टिव्हाला मागून जोरात धडक दिली. यात विजय भुरे यांच्या पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर विजय भुरे गंभीर जखमी झाले. धडक देताच ट्रक रोडलगत उलटला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर.भंडारा महामार्गावरील गुमथळा शिवारात गुरुवारी (दि. १०) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मोना भुरे (रा. भंडारा) असे मृताचे नाव आहे. विजय भुरे हे भाजपचे तुमसर (जि. भंडारा) विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांचे स्वीय सहायक आहेत. ते त्यांच्या पत्नी मोनासोबत एमएच ३६ जी ७२३६ क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने भंडाऱ्याहून नागपूरला जात होते. ते गुमथळा (ता. कामठी) शिवारातील पेट्रोलपंपाजवळ पोहोचताच मागून वेगात आलेल्या टीएन ३० बीपी ९६९९ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली.
धडक लागताच चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि अॅक्टिव्हासह ट्रक रोडलगतच्या मोकळ्या जागेवर जाऊन उलटला. यात मोना यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर विजय भुरे यांना गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून विजय भुरे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले, तर तपासणीसाठी पाठविला. उपचारासाठी नागपूर शहरातील खासगी रुग्णालयात भरती केले, तर मोना यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.