Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 22:23 IST2025-12-30T22:21:21+5:302025-12-30T22:23:17+5:30
Nagpur Municipal Election 2026: नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ असे बिरुद मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली.

Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
नागपूर: महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ असे बिरुद मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली. अनेकांनी पक्षावरील नाराजीतून पद किंवा पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा दिला. पक्षनेत्यांकडून नाराजांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू होते.
भाजपने यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. त्यात डावलल्या गेल्यामुळे अनेक जण नाराज झाले. त्यातूनच काहींनी पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा दिला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग १६-ड चे अध्यक्ष गजानन निशितकर यांनी पक्षाने बाहेरच्या प्रभागातील उमेदवाराला तिकीट दिल्याची नाराजी व्यक्त करत पद व सदस्यत्वाचा राजिनामा दिला. त्याबाबत त्यांनी शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांना पत्रदेखील पाठविले. बजाजनगर, लक्ष्मीनगर, देवनगर, सुरेंद्रनगर, विकासनगर, विवेकानंदनगर मधील अनेक कार्यकर्त्यांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे. त्यांनीदेखील पक्षाच्या पदांचे राजिनामे दिले आहेत. त्याचप्रमाणे माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनीदेखील तिकीट न मिळाल्याने पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा दिला आहे.
प्रभाग २७ ड मधून भाजपचे माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली. भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री राम अहीरकर यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंडळ उपाध्यक्ष आसावरी कोठीवान यांनीदेखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तसेच प्रभाग ३३ मधून गोलू बोरकर यांनी देखील अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले. प्रभाग १४ मधील सुनिल अग्रवाल यांना उमेदवारी न दिल्याने ४२ कार्यकर्त्यांनी सामूहिक राजिनामा दिला.