Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 20:47 IST2019-10-03T20:24:10+5:302019-10-03T20:47:14+5:30
गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली.

Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकिकडे भाजपामध्ये उफाळलेली बंडखोरी शमविण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे. पण वारंवार गटबाजीचा फटका बसलेल्या काँग्रेस पक्षामध्ये अजूनही गटबाजी कायम आहे. गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली.
काँग्रेसने शहरातील सहा विधानसभेपैकी पाच विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या नावाची घोषणा बुधवारी केली. बुधवारी रात्री उशिरा मध्य आणि पूर्व विधानसभेचे उमेदवार घोषित केले. मात्र पश्चिम, उत्तर व दक्षिणचे उमेदवार मंगळवारीच घोषित झाले होते. विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी आमंत्रित केले. नितीन राऊत आणि बंटी शेळके यांनी ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांना आमंत्रित केले आहे. गुरुवारी विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांच्या रॅलीत माजी खासदार विलास मुत्तेमवार उपस्थित होते. पण माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद उपस्थित नव्हते. बंटी शेळके यांनी रॅलीमध्ये दाखल होऊन, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. परंतु ज्या नेत्यांची सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, पुन्हा एकदा काँग्रेसच्या एकजुटीचा संदेश शहरभर पोहचवायचा होता, ते ज्येष्ठ नेते या रॅलीत दिसले नाही. या रॅलीमध्ये अनंतराव घारड, बबनराव तायवाडे सहभागी झाले होते.