Lok Sabha Election 2019; रामटेक गडावर पहिला झेंडा काँग्रेसचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:03 AM2019-04-02T11:03:02+5:302019-04-02T11:59:10+5:30

रामटेकच्या गडावर सध्या भगवा असला तरी या मतदार संघातील मतदारांनी काँग्रेसवर भरपूर प्रेम केले आहे. आजवर या मतदार संघात झालेल्या १७ निवडणुकीत १२ वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.

Lok Sabha Election 2019; The first flag on the Ramtek fort is the Congress | Lok Sabha Election 2019; रामटेक गडावर पहिला झेंडा काँग्रेसचाच

Lok Sabha Election 2019; रामटेक गडावर पहिला झेंडा काँग्रेसचाच

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत १२ खासदार

जितेंद्र ढवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : रामटेकच्या गडावर सध्या भगवा असला तरी या मतदार संघातील मतदारांनी काँग्रेसवर भरपूर प्रेम केले आहे. आजवर या मतदार संघात झालेल्या १७ निवडणुकीत १२ वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. गडावर विजयाचा पहिला झेंडा रोवण्याचा मानही काँग्रेसलाच जातो. विशेषत: देशातील राजकीय परिस्थिती विचारात घेता या मतदार संघातील मतदारांनी कौल दिल्याचे आजवरच्या निकालावरून स्पष्ट होते. १९७४ मध्ये काँग्रेसला रामटेकमध्ये पहिला धक्का बसला मात्र त्यानंतर पुन्हा सावरले.
स्वतंत्र मतदार संघ म्हणून अस्तित्वात आलेल्या रामटेकमध्ये पहिली निवडणूक १९५७ मध्ये झाली. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात होते. यात काँग्रेसचे कृष्णराव देशमुख यांनी बाजी मारली. त्यांचा सामना अपक्ष उमेदवार कृष्णराव यावलकर यांच्यासोबत होता. देशमुख यांना १ लाख ६६ हजार १२३ तर यावलकर यांना १ लाख २ हजार ४५० मते मिळाली. १९६२ मध्ये माधवराव पाटील यांच्यावर काँग्रेसची धुरा होती. पाटील १ लाख ४६ हजार ७०६ मते घेत विजयी झाले. त्यांनी शेकापचे बी. टी. भोसले यांचा ४१ हजार ३०२ मतांनी पराभव केला. भोेसले यांना १ लाख ५ हजार ४०४ मते मिळाली.
१९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे अमृत सोनार १ लाख ५ हजार ३४९ मतांनी विजयी झाले. सोनार यांना १ लाख ८३ हजार २५८ तर त्यांचे प्रतिस्पर्धी आर.एन.पाटील यांना ७७ हजार ९०९ मते मिळाली.
१९७१ काँग्रेससाठी देशात धोक्याचे वर्ष होते. याही वेळी सोनार यांना कॉँग्रेसने संधी दिली. सोनार यांनी २ लाख ३१ हजार ७४२ मतांनी विजयी होत रेकॉर्ड ब्रेक केला. या निवडणुकीत सोनार यांना २ लाख ८० हजार ५४ तर प्रतिस्पर्धी एफबीएलचे आनंदराव कळमकर यांना ४८ हजार ३१२ मते मिळाली.
आणीबाणीनंतर १९७४ मध्ये रामटेकमध्ये निवडणूक झाली. नाग विदर्भ समितीचे उमेदवार राम हेडाऊ विजयी झाले. हेडाऊ यांना २,१९,८६० तर काँग्रेसचे आनंदराव कळमकर यांना ८८,७३२ मते मिळाली. यानंतर १९७७ च्या निवडणुकीत जतिराम बर्वे यांनी काँग्रेसचा गड पुन्हा ताब्यात घेतला. बर्वे यांनी अपक्ष उमेदवार राम हेडाऊ यांचा ४२ हजार ९४९ मतांनी पराभव केला. बर्वे यांना १ लाख ९६ हजार ९७७ तर हेडाऊ यांना १ लाख ५४ हजार २८ मते मिळाली. १९८० मध्ये बर्वे पुन्हा एकदा २ लाख १४ हजार ७६३ इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांनी जनता पक्षाचे राजेंद्रबाबू देशमुख यांचा पराभव केला. देशमुख यांना ५९ हजार १९४ तर बर्वे यांना २ लाख ७३ हजार ९५७ मते मिळाली.
काँग्रेस उमेदवारांचा सतत विजय. लाखांची आघाडी. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रीय नेते पी.व्ही.नरसिंहराव यांना १९८५ मध्ये रामटेकच्या मैदानात उतरविले. राव यांनाही रामटेकच्या मतदारांनी डोक्यावर घेत १ लाख ८५ हजार ९७२ मतांनी विजयी केले. राव यांची टक्कर समाजवादी काँग्रेसचे शंकरराव गेडाम यांच्याशी झाली. गेडाम यांना १ लाख ४ हजार ९३३ तर राव यांना २ लाख ९० हजार ९०५ मते मिळाली. १९८९ मध्येही राव पुन्हा काँग्रेसचा झेंडा घेऊन गडावर स्वार होण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्या वाटेत काटे होते. त्यांची जनता दलाचे पांडुरंग हजारे यांच्याशी लढत झाली. राव ३४ हजार ४७० मतांनी जिंकले. हजारे यांना २ लाख २३ हजार ३३० तर राव यांना २ लाख ५७ हजार ८०० मते मिळाली. १९९१ मध्ये राव परत गेल्यानंतर काँग्रेसने तेजसिंहराव भोसले यांना उमेदवारी दिली. भोसले यांनी भाजपचे पांडुरंग हजारे यांचा १ लाख ३७ हजार ९५४ मतांनी पराभव केला. भोसले यांना २ लाख ४० हजार ४३७ तर हजारे यांना १ लाख २ हजार ४८३ मते मिळाली. १९९६ मध्ये दत्ता मेघे रामटेकमध्ये आले. मेघे यांनी मतदार संघ बदलल्याने त्यांची राजकीय कोंडी करण्यासाठी ३७ उमेदवारांनी दंड थोपटले होते. मेघे यांनी हा चक्रव्यूह भेदत गडावर काँग्रेसचा झेंडा फडकविला. त्यांनी सेनेचे प्रकाश जाधव यांचा पराभव केला. जाधव यांना १ लाख ८१ हजार ४६६ तर मेघे यांना २ लाख ७ हजार १८८ मते मिळाली.
१९९८ मध्ये राणी चित्रलेखा भोसले यांनी सेनेचे अशोक गुजर यांचा पराभव केला. चित्रलेखा यांना ३ लाख २५ हजार ८८५ तर गुजर यांना २ लाख ५८ हजार ८४७ मते मिळाली. मात्र १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांचा सेनेचे सुबोध मोहिते यांनी ११ हजार ६८९ मतांनी पराभव केला. मोहिते यांना २ लाख ४२ हजार ४५४ तर पुरोहित यांना २ लाख ३० हजार ७६५ मते मिळाली.
मोहिते यांची कोंडी करण्यासाठी २००४ मध्ये कॉँग्रेसने श्रीकांत जिचकार यांना उमेदवारी दिली. मात्र यात ते यशस्वी होऊ शकले नाही. जिचकार यांना २ लाख ६२ हजार ५५० तर मोहिते यांना २ लाख ७६ हजार ५९८ मते मिळाली. मोहिते यांना रामटेकमध्ये दुसरी टर्म मिळाली. मात्र दोन वर्षात राज्याच्या राजकारणात नारायण राणे यांनी भूकंप केला. मोहिते राणेसोबत काँग्रेसमध्ये आले. रामटेकमध्ये २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली. यावेळी मोहिते काँग्रेसचे तर प्रकाश जाधव सेनेचे उमेदवार होते. जाधव यांनी ३२ हजार ५७२ मतांनी मोहिते यांचा पराभव केला. जाधव यांना २ लाख ३१ हजार २४१ तर मोहिते यांना १ लाख ९८ हजार ६६९ मते मिळाली. गडावर भगवामय वातावरण असताना २००९ मध्ये काँग्रेसने मुकुल वासनिक यांना रामटेकमधून लढविले. वासनिक सेनेचे कृपाल तुमाने यांना टक्कर देत विजयी झाले. वासनिक यांना ३ लाख ११ हजार ६१४ तर तुमाने यांना २ लाख ९४ हजार ९१३ मते मिळाली.
२०१४ मध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा वासनिक यांच्यावर विश्वास टाकला. मात्र मोदी लाटेत वासनिक हरले. सेनेचे कृपाल तुमाने यांनी वासनिक यांचा १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभव केला. तुमाने यांना ५ लाख १९ हजार ८९२ तर वासनिक यांना ३ लाख ४४ हजार १०१ मतावर समाधान मानावे लागले.

Web Title: Lok Sabha Election 2019; The first flag on the Ramtek fort is the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.