बाळू धानोरकर यांना आज अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 10:22 IST2023-05-31T10:20:39+5:302023-05-31T10:22:58+5:30

नवी दिल्लीत मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

Last farewell to Congress MP Balu Dhanorkar today | बाळू धानोरकर यांना आज अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

बाळू धानोरकर यांना आज अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी

चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे खासदार सुरेश नारायण उर्फ बाळू धानोरकर यांचे मंगळवारी (दि. ३० मे) पहाटे ३:३० वाजता दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता वरोरा या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अल्पावधीत राजकीय क्षेत्रात ठसा उमटविणारे खासदार बाळू धानोरकर या लाडक्या लोकनेत्याचे पार्थिव मंगळवारी दुपारी वरोरा येथील निवासस्थानी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी झाली. चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रातील हजारो नागरिक अत्यंत खिन्न मनाने भाऊंच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत वरोऱ्यात दाखल होत असल्याचे दिसून आले. लोकसेवेचे राजकारण करत असताना त्यांनी तरुणाईला आपलेसे केल्याने अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत.

धानोरकर यांना किडनी विकारावरील उपचारासाठी बुधवारी (दि. २४) नागपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले होते. त्याचदरम्यान वडील नारायण धानोरकर यांच्यावरही नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, शनिवारी (दि. २७) त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अंत्यसंस्कारालाही जाऊ शकले नाही. त्यानंतर रविवारी (दि. २८) अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, मंगळवारी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, मानस आणि पार्थ ही दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. 

Web Title: Last farewell to Congress MP Balu Dhanorkar today