भारतीय रेल्वेची ऐतिहासिक घोषणा : पनवेल–चिपळूणदरम्यान ६ अनारक्षित विशेष गाड्याही
By नरेश डोंगरे | Updated: August 22, 2025 20:23 IST2025-08-22T20:21:44+5:302025-08-22T20:23:08+5:30
Nagpur : भाविक मुंबई, पुणे आणि कोकणातील विविध शहरात दाखल होऊन बाप्पाचे दर्शन घेतात. ते लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेने आपले नियोजन केले आहे

Historic announcement by Indian Railways: 6 unreserved special trains between Panvel-Chiplun
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचा उत्सव पुढ्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक व प्रवाशांना अधिक सुलभ तसेच आरामदायक प्रवास मिळावा यासाठी भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी ३८० गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे, मध्य रेल्वेने २०२३ मध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत ३०५ तर २०२४ मध्ये ३५८ स्पेशल ट्रेन चालविल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आणखी २२ गाड्यांची वाढ केली आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत देश-विदेशातील भाविक महाराष्ट्रात दाखल होतात. सर्वाधिक भाविक मुंबई, पुणे आणि कोकणातील विविध शहरात दाखल होऊन बाप्पाचे दर्शन घेतात. ते लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेने आपले नियोजन केले आहे. गणेशोत्सव २७ ऑगस्ट पासून सुरू होणार असून ६ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र, गणेश फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन २२ ऑगस्टपासूनच मुंबई, पुणे, कोकण, पनवेल, चिपळूनसह विविध भागांत धावणार आहेत. त्यात पनवेल ते चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित गणपती विशेष गाड्यांची घोषणाही मध्य रेल्वेने केली आहे.
यूटीएस प्रणालीवर तिकिट उपलब्ध
तिकिट काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर तिकिट काउंटरवर जाऊन लांबच लांब रांगेत उभे राहण्याऐवजी मध्य रेल्वेने प्रवाशांना आणखी एक सुविधाजनक पर्याय दिला आहे. त्यानुसार, आता या गाड्यांमधील अनारक्षित डब्यांतील तिकिटे प्रवासी यूटीएस प्रणालीद्वारे काढू शकतात.