२४ तासांत आगीचा चार ठिकाणी भडका, लाखो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 13:02 IST2023-03-29T13:01:06+5:302023-03-29T13:02:30+5:30
गेल्या २४ तासांत शहरातील विविध भागांत आगीच्या चार घटना

२४ तासांत आगीचा चार ठिकाणी भडका, लाखो रुपयांचे नुकसान
नागपूर : गेल्या २४ तासांत शहरातील विविध भागांत आगीच्या चार घटना घडल्या. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळाले. खरबी येथील एका शेतातही लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले. सोमवारी रात्री माजी नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या घराला आग लागली होती. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दीड लाखाचे नुकसान झाले आहे. देण्यात आली.
रमाईनगरात घर जळाले
कपिलनगर पोलिस स्टेशनसमोरील रमाईनगर गल्ली नंबर सहामधील राहुल मेश्राम यांच्या घराला लागलेल्या आगीत सात लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या घरात असलेली उडन मेटल लेझर मशीन रेडियम मशीन सीपीसी लॅपटॉप इत्यादी सामानही आगीत नष्ट झाले. सुगतनगर येथून अग्निशमन पथकाने आग विझविली.
खरबीमध्ये शेतात आग
खरबी येथील सीबीएससी स्कूलच्या बाजूला असलेल्या शेतात लागलेल्या आगीत शेतात ठेवलेले ठिबक सिंचनाचे साहित्य, पीव्हीसी पाइप जळून खाक झाले, जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतमालकाने वर्तविला. सक्करदरा अग्निशमन पथकाने आग विझविण्याची कारवाई केली.
व्हिएचबी कॉलनीमध्येही घरातील साहित्य खाक
व्हिएचबी कॉलनीच्या मागे राहणाऱ्या मीराबाई कुळमेथे यांच्या घराला आग लागून आगीत फ्रिजची वायरिंग, वॉशिंग मशीन, आलमारी व प्लास्टिकचे दरवाजे खाक झाले. ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. ही आग विझविण्यासाठी सिव्हील स्टेशन, त्रिमूर्तीनगर स्टेशन, कॉटन मार्केट स्टेशनमधून गाडी रवाना झाली होती.