जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:15 IST2019-04-08T22:13:06+5:302019-04-08T22:15:57+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढवा घेतांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या.
मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात पोलीस उपायुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त निर्मला देवी, पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त विवेक मसाळे, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभानिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संबंधित भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी सतत समन्वय ठेवावे. मतदान केंद्र परिसरात ध्वनिक्षेपकांवर बंदी असावी, दिव्यांगांना मतदान केंद्र परिसरात जाण्यासाठी सहकार्य करण्यात यावे, मतदारांना रांगेत मतदान करण्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावे. दिलेल्या वेळेत मतदान झाल्यानंतर संबंधित मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन जीपीएस वाहनाने कळमना येथे नेण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी विशेष खबरदारी घेऊन काम करावे. कळमना येथील स्ट्राँंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्यानंतर त्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत लक्ष ठेवावे, यासह मतदान प्रक्रियेशी संबंधित विविध बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.