कामठीत काँग्रेसचा पराभव ‘फिक्सिंग’चा परिणाम : सुरेश भोयर यांचा आरोप
By गणेश हुड | Updated: June 9, 2025 19:09 IST2025-06-09T19:09:03+5:302025-06-09T19:09:52+5:30
Nagpur : ३५ हजार बोगस मतदारांची भर

Congress' defeat in Kamthi is the result of 'fixing': Suresh Bhoyar alleges
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या कामठी विधानसभा निवडणुकीत तब्बल ३५ हजार ५३९ नव्या मतदारांची भर पडली असून, यातील बहुतांश नावं रहिवासी पुराव्याशिवाय आणि आधार कार्डाच्या आधारेच नोंदवण्यात आली, असा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांनी पत्रकार परिषदेत केला.
भोयर यांनी सांगितले की, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी कामठी मतदारसंघात ४ लाख ६६ हजार २३१ मतदार होते, तर फक्त पाच महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत ही संख्या ५ लाख १ हजार ७७० झाली. विशेष म्हणजे, अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर केवळ १५ दिवसांत १२ हजार नवीन मतदारांची ऑनलाईन नोंद करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मतदार नोंदणीचा हा विक्रम अभूतपूर्व आहे,” असे भोयर म्हणाले. राहुल गांधी यांनी भाजपने विधानसभा निवडणुकीत ‘फिक्सिंग’ केल्याचा जो आरोप केला, तो शंभर टक्के सत्य असल्याचे प्रतिपादन भोयर यांनी केले. संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी केली गेली. पत्रकार परिषदेला जि.प.चे माजी सदस्य दिनेश ढोले, निरज लोणारे, शेख इर्शाद, सुमेत रंगारी, धीरज यादव, तुषार गेडाम, नरेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.
चार नगरपंचायतीत वाढले १६ हजारहून अधिक मतदार
- बहादुरा-खरबी : ५,०८४
- बेसा-पिपळा : ३,६६७
- नरसाळा-हुडकेश्वर : ४,७१२
- बिडगाव : २,९६१
काँग्रेसला मते मिळूनही पराभव
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कामठीमध्ये १ लाख ३६ हजार मते मिळाली होती, आणि विधानसभेला देखील १ लाख ३४ हजार मते मिळूनही पराभव झाला, यामागे बोगस मतदारांचा स्पष्ट हस्तक्षेप असल्याचा दावा करण्यात आला.
सुरेश भोयर यांनी उपस्थित केलेले मुद्दे:
- पाच ते सहा महिन्यांत कामठी मतदारसंघात ३५,५३९ मतदार कसे वाढले?
- अंतिम मतदार यादीनंतर १२ हजार ऑनलाईन नोंदणी कशी झाली?
- मतदार यादीत नाव समाविष्ट करताना रहिवासी पुरावा का मागितला नाही?
- निवडणूक आयोग माहितीच्या अधिकारात माहिती का देत नाही?
- भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांचे लॉगिन वापरून नोंदणी केली.