नागपुरातील पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांचा घणाघात...विरोधकांकडे ना निती ना नियत, काम करण्याचीदेखील ताकद नाही
By योगेश पांडे | Updated: January 6, 2026 20:11 IST2026-01-06T20:10:46+5:302026-01-06T20:11:35+5:30
Nagpur : महानगरपालिका निवडणूकीसाठी पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आम्ही केवळ विकासाचे राजकारण करत असून प्रचारातदेखील त्याच मुद्द्यांवर आमचा भर आहे.

Chief Minister's attack in the very first meeting in Nagpur... The opposition has neither policy nor determination, nor even the strength to work.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका निवडणूकीसाठी पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आम्ही केवळ विकासाचे राजकारण करत असून प्रचारातदेखील त्याच मुद्द्यांवर आमचा भर आहे. परंतु विरोधकांकडे कुठलीही निती, योग्य नियत व काम करण्याची ताकददेखील नाही. आमच्या नगरसेवकांच्या पाठीशी मी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहोत. त्यामुळे महायुतीचा नगरसेवक जे काम करू शकेल ते इतर नगरसेवक करूच शकणार नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. बोरगाव येथे मंगळवारी आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.
नागपुरात ज्या प्रकारचा विकास झाला आहे तो सांगण्याची गरज नाही. जनतेला तो डोळ्याने दिसतो आहे. पायाभूत सुविधांमध्ये नागपूर आघाडीवर आहे. पुढच्या दशकातील वेगाने विकसित होणारे नागपूर शहर असेल असे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. नागपूरला आम्ही आधुनिक शहर केले आहे. आता नागपुरला देशातील सर्वोत्तम शहर करू असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. जेथे चांगल्या शिक्षणसंस्था असतात तेथेच उद्योग येतात. आम्ही देशातील सर्व मोठ्या शिक्षणसंस्था नागपुरात आणल्या. मिहानच्या माध्यमातून एक लाखांहून अधिक रोजगार मिळाला आहे. आणखी दोन लाख कोटींची गुंतवणूक आली असून एक लाख नवीन रोजगारांची निर्मिती होणार आहे, असे फडणवीस म्हणाले. नागपुरात अनेक वर्ष सत्तेवर असलेल्यांनी केवळ राजकारणच केले होते. निवडणूका आल्या की झोपडपट्टी पट्टेवाटपाची घोषणा व्हायची, परंतु त्याची अंमलबजावणी कधीच झाली नाही. आमच्या सरकारने झोपडपट्टी पट्टेवाटप करून दाखविले, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.
तीन वर्षांत नागपूर टॅंकरमुक्त करणार
२४ बाय ७ ची योजना देशात सर्वात पहिले नागपुरात राबविण्यात आली व शहरातील अनेक भागात ती सुरू झाली आहे. उन्हाळ्यात विविध शहरांच्या महानगरपालिकांमध्ये मटके मोर्चा असतात. नागपुरात केवळ काही भागातच टॅंकरने पाणी पुरविले जाते. पुढील दोन ते तीन वर्षांत नागपूर टॅंकरमुक्त होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
गोरेवाड्यात आणखी दोन सफारी
गोरेवाडा झू उभारण्याची मागणी मी पश्चिम नागपुरचा आमदार असताना सर्वात अगोदर केली होती. आता तेथे आणखी दोन सफारी सुरू होणार असून पंचतारांकित हॉटेलदेखील उभारण्यात येणार आहे. तेथे २५ लाख पर्यटक भेट देतील असे नियोजन आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.