कामठी नगराध्यक्षपद निवडणुकीला आव्हान; अब्दुल शकूर नागानी यांची जिल्हा न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:10 IST2026-01-10T18:07:29+5:302026-01-10T18:10:30+5:30
Nagpur : पराभूत उमेदवार अब्दुल शकूर नागानी यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून कामठी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे.

Challenge to Kamthi Mayor's election; Abdul Shakoor Nagani files petition in district court
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पराभूत उमेदवार अब्दुल शकूर नागानी यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून कामठीनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. ही निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे.
याचिकेमध्ये विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकूण मतदान आणि ईव्हीएममधील मतांमध्ये १० मतांची तफावत आढळून आली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही या निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला नाही आणि महाराष्ट्र नगर परिषद कायद्याचे उल्लंघन करून ईव्हीएमचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, असे नागानी यांचे म्हणणे आहे.
नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना नोटीस
याचिकेवर न्यायाधीश एस. एस. मौदेकर यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्यासह इतर १४ उमेदवारांना नोटीस बजावून १९ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. या निवडणुकीत अग्रवाल यांनी १०३ मतांनी विजय मिळवला आहे. नागानी यांच्यातर्फे अॅड. निहालसिंग राठोड यांनी कामकाज पाहिले.