उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब जुळेना : स्पष्टीकरण मागवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:30 IST2019-04-15T23:28:59+5:302019-04-15T23:30:25+5:30
नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. परंतु या निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारावर केलेल्या खर्चाचा जो हिशेब सादर केला आहे, तो प्रशासनाने नोंदविलेल्या खर्चाच्या हिशेबाबरोबर अजूनही जुळलेला नाही. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीत आणि प्रशासनाच्या नोंदीत लाखोंची तफावत आढळून आली आहे. या सर्व उमेदवारांना नोटीस बजावून खर्चाचे स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले.

उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब जुळेना : स्पष्टीकरण मागवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. परंतु या निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारावर केलेल्या खर्चाचा जो हिशेब सादर केला आहे, तो प्रशासनाने नोंदविलेल्या खर्चाच्या हिशेबाबरोबर अजूनही जुळलेला नाही. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीत आणि प्रशासनाच्या नोंदीत लाखोंची तफावत आढळून आली आहे. या सर्व उमेदवारांना नोटीस बजावून खर्चाचे स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले.
नागपूर लोकसभा क्षेत्रात ३० तर रामटेक लोकसभा मतदार संघात १६ उमेदवार रिंगणात आहेत. २९ मार्चपासून या उमेदवारांचा प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला. उमेदवारांना निवडणुकीत ७० लाखांपर्यंत रक्कम खर्च करण्याचे अधिकार आहेत. निवडणुकीकरिता उमेदवारांना खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. या खात्यातून सर्व खर्च करणे आवश्यक आहे. खर्चाची माहिती निवडणुकीच्या काळात तीनदा सादर करणेही बंधनकारक आहे. काही उमेदवार वगळता इतर सर्वच उमेदवारांनी वेळेत खर्चाची माहिती सादर केली. बहुतांश उमेदवारांनी दिलेली खर्चाची माहिती आणि निवडणूक विभागाच्या खर्च विभागाकडून काढण्यात आलेल्या खर्चाच्या माहितीत प्रचंड तफावत आहे. नागपूर लोकसभा क्षेत्रातील सहा उमेदवारांच्या खर्चात तफावत समोर आली आहे. ही तफावत लाखांच्या घरात आहे. यात भाजप उमेदवार नितीन गडकरी, काँग्रेस उमेदवार नाना पटोले, बसपचे मोहम्मद जमाल, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांचा समावेश आहे. रामटेक लोकसभा मतदार संघात फक्त शिवसेना उमेदवार कृपाल तुमाने यांनी सादर केलेली खर्चाची माहिती आणि निवडणूक विभागाकडून काढण्यात आलेल्या खर्चातही प्रचंड तफावत आढळून आली आहे.