प्रचार थांबला; मतदार सज्ज; आता लक्ष मतदानाकडे.. रॅलींमुळे अनेक भागात वाहतूक झाली कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:17 IST2026-01-14T16:14:22+5:302026-01-14T16:17:24+5:30
Chandrapur : मनपा निवडणुकीच्या १० दिवसांच्या प्रचाराचा मंगळवारी (दि. १३) शेवटचा दिवस शहरात प्रचंड राजकीय गजबजाट घेऊन उजाडला.

Campaigning stopped; voters ready; now focus on voting.. Rallies caused traffic jams in many areas
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मनपा निवडणुकीच्या १० दिवसांच्या प्रचाराचा मंगळवारी (दि. १३) शेवटचा दिवस शहरात प्रचंड राजकीय गजबजाट घेऊन उजाडला. सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराची अधिकृत सांगता होणार असल्याने, सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. उमेदवारांचा प्रचार थांबला असून मतदार मतदानासाठी सज्ज झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, तर भाजपकडून भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री हंसराज अहीर व आमदार किशोर जोरगेवार यांनी आपआपल्या पक्षातील उमेदवारांचा जोरदार प्रचार केला.
रॅलींमुळे अनेक भागात वाहतूक झाली कोंडी
प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या दिवशी 'रोड शो'द्वारे शक्तीप्रदर्शन केले. समर्थकांच्या गर्दीमुळे अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला. गुरुवारी (दि. १५) १७प्रभागांतील ६६ जागांसाठी मतदान होणार असून, ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
अन् रॅलींना उधाण
शेवटच्या टप्प्यात रॅली, रोड शो, मिरवणूक, कॉर्नर सभा व प्रचार वाहनांसाठी सादर केलेले अर्ज प्रशासनाकडे प्रलंबित होते. सोमवारी (दि. १२) या अर्जाना मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळताच या उमेदवारांनी आपआपल्या प्रभागात जोरदार रॅली काढत प्रचाराचा शेवट गाजविला.
महिलांची रॅली व 'डोअर टू डोअर' प्रचारावर भर
किल्ल्याच्या आतील प्रभागांमध्ये महिलांच्या रॅलींना विशेष महत्त्व देण्यात आले. काही उमेदवारांनी २० ते ३० महिलांचे पथक तयार करून 'डोअर टू डोअर' प्रचार करत मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला. युवक व कार्यकर्ते भरदुपारीही घामाघूम होऊन प्रचारात व्यस्त दिसून आले.
प्रचार गीतांनी शहर दणाणले
पठाणपुरा गेट, जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट, विनबा गेट परिसरात प्रत्येक चौकात सभा सुरू होत्या. तुकूम, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, वडगाव परिसरातही घोषणाबाजी व प्रचार गीतांनी वातावरण ढवळून निघाले. प्रचार वाहनांची सतत ये-जा आणि भोंग्यांमधील गाण्यांनी शहर दणाणून गेले.
अपक्षांचीही दुचाकी रॅली
मनपा निवडणुकीत १२६ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारांनीही पायी फेऱ्या, दुचाकी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. मुख्य चौकांत मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार केला.