अमरावती, वर्धा, भंडारा ओलेचिंब ; नागपूरमध्ये मात्र सूर्यनमस्कार!
By निशांत वानखेडे | Updated: August 14, 2025 19:41 IST2025-08-14T19:40:19+5:302025-08-14T19:41:28+5:30
वेधशाळेच्या अंदाजाला हुलकावणी : विदर्भात ढगांची शांतता

Amravati, Wardha, Bhandara are experiencing heavy rain; but sunlight in Nagpur!
नागपूर : बुधवारी दिवसभर व त्यानंतर रात्रीही धाे-धाे बरसलेल्या पावसाळी वातावरणाने गुरुवारची सकाळ हाेताच आश्चर्यकारकरित्या पलटी मारली. अंदाजानुसार स्वातंत्र्यदिनापर्यंत श्रावणसरी थांबणार नाही, असे वातावरण असताना सकाळी सूर्य दर्शनाने ही शक्यता फाेल ठरवली. विदर्भात काही जिल्ह्यात आकाश निरभ्र झाले, तर गाेंदिया, अमरावती वगळता इतर जिल्ह्यात दिवसभर ढगांनी शांतता बाळगली.
हवामान विभागाने १३ ते १५ ऑगस्टपर्यंत विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज वर्तवला हाेता. बुधवारी हा अंदाज खराही ठरला. नागपूरसह बहुतेक जिल्ह्यात श्रावणसरींनी धुवांधार हजेरी लावली. विशेष म्हणजे पावसाची तीव्रता रात्रीही कायम हाेती. पावसाने सर्व भाग व्यापून टाकला. अमरावती व वर्धा जिल्ह्यात अति पावसाची नाेंद झाली. अमरावती शहरात सकाळपर्यंत ९६ मि.मी. पाऊस झाला, तर जिल्ह्यात चांदूर रेल्वे परिसरात १०७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. वर्धा शहरातही सकाळपर्यंत ११०.२ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आर्वी, देवळी, सेलू हा परिसरही प्रभावित हाेता. अकाेला शहरात सकाळपर्यंत २४ मि.मी. नाेंद झाली, तर जिल्ह्यातील मुर्तीजापूर भागात ४८.४ मि.मी. पाऊस झाला. यवतमाळ शहरातही धुवांधार बॅटिंग करीत ७२.१ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात राळेगाव तालुक्यात ८४.५ मि.मी.पाऊस झाला.
भंडारा शहरात रात्रभर मुसळधार सरी बरसल्या. येथे ७३.५ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूर शहरात ५३ मि.मी., तर वराेरा तालुक्यात ५४ मि.मी. नाेंद झाली. गडचिराेली शहरात ढग शांत राहिले. नागपूर शहरात सकाळपर्यंत १७.९ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात हिंगणा तालुक्यात ४०.८ मि.मी. सह दमदार हजेरी लागली. सकाळपर्यंत अशी परिस्थिती असल्याने ही झड गुरुवारीही कायम राहिल, असे वाटत हाेते. सकाळपर्यंत आकाशात ढगांचे चित्रही तसे हाेते. मात्र काही वेळातच चित्र बदलले. सूर्य जसजसा वर आला, तसे ढगांमधील आर्द्रता कमी हाेत गेली. नागपूरला आकाशातून ढगही दिसेनासे झाले. दुपारनंतर पुन्हा ढगांची गर्दी झाली, पण त्यातून सरी बरसल्या नाही. केवळ अमरावतीला दिवसभर ९ मि.मी. आणि गाेंदिया येथे ७ मि.मी. नाेंद झाली. दरम्यान १५ ऑगस्टला पाऊस हाेईल, हा वेधशाळेचा अंदाज कायम आहे.
पश्चिम साेडून इतर भागात पाऊस सामान्य
जिल्हा या काळात सामान्य पाऊस झालेला पाऊस कमी/अधिक
नागपूर ६१७.७ ६१८.९ ०
भंडारा ७१२.९ ७०४.५ - १
गाेंदिया ७९६.१ ७६३.६ - ४
चंद्रपूर ७१२.१ ७२५.२ २
गडचिराेली ८५२.१ ९२५.४ ९
वर्धा ५६३.४ ५१७.८ - ८
अकाेला ४६५ ३२८.३ - २९
अमरावती ५४२.९ ३६६.५ -३२
यवतमाळ ५५० ४८५.१ - १२
वाशिम ५२२.८ ४६०.२ - १२
बुलढाणा ४१८.४ ३९९.४ - ५
विदर्भ ६२१.३ ५८४.९ -६