रात्रंदिवस ६० भरारी पथकांची निगराणी, आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी मनपाची कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 22:19 IST2025-12-26T22:19:43+5:302025-12-26T22:19:51+5:30
Nagpur Municipal Corporation Election: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी शहरात एकूण ६० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. मनपाच्या दहा झोनमध्ये प्रत्येकी ६ पथके कार्यरत असून ही पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत.

रात्रंदिवस ६० भरारी पथकांची निगराणी, आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी मनपाची कडक कारवाई
- क्षितिजा देशमुख
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी शहरात एकूण ६० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. मनपाच्या दहा झोनमध्ये प्रत्येकी ६ पथके कार्यरत असून ही पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत.
मनपा आयुक्त तथा प्रशासक अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन केले जात आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात असून कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेवर लक्ष ठेवण्याची आणि भरारी पथकांच्या कामकाजाची मुख्य जबाबदारी उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक झोनमध्ये ६ पथके तैनात राहणार असून प्रत्येक पथकात दोन अधिकारी असतील. मनपाच्या पथकासोबत पोलीस कर्मचारी आणि व्हिडीओग्राफरही असणार आहेत. या पथकांना पंचनामा करण्यासह साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले असून, शहरात कोणत्याही प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.