राज्य अर्थसंकल्पात नागपूरच्या 'ग्रोथ हब'साठी पाच हजार कोटी; रिंगरोड प्रकल्पालाही मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:08 IST2026-03-07T18:35:10+5:302026-03-07T19:08:41+5:30
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उपराजधानी नागपूरला बूस्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागपूर महानगराला 'ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५ वर्षात सुमारे ५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

5 thousand crores for Nagpur's 'Growth Hub' in the state budget; Ring Road project also approved
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उपराजधानी नागपूरला बूस्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागपूर महानगराला 'ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्यासाठी ५ वर्षात सुमारे ५ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. मुंबई महानगराच्या धर्तीवर 'पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब'साठी नीती आयोग रोड मॅप तयार करणार आहे. या निधीतून उद्योग, आयटी, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीला चालना दिली जाणार आहे. राज्यातील मोठ्या शहरांसह नागपूरमध्येही मेट्रो नेटवर्क विस्तार आणि शहरी वाहतूक सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे.
नागपूरला 'न्यू नागपूर' या नावाने व्यापार आणि वित्तीय केंद्र (ट्रेड अँड फायनान्शियल सेंटर) म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यामुळे आयटी, सेवा व उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार. नागपूर शहराच्या विस्तारासाठी नागपूर रिंगरोड प्रकल्पाला मान्यता. वाहतूक सुलभता व औद्योगिक विकासासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. राज्याच्या सार्वभौम डेटाचे व अनुप्रयोगांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी नागपूर येथे अत्याधुनिक 'स्टेट डेटा सेंटर' स्थापन केले जाईल. नैसर्गिक तसेच मानव-निर्मित आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी 'मिहान' नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाईल. सार्वजनिक आरोग्याच्या सर्वकष उन्नतीसाठी एम्स, आयआयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण आणि संशोधनासाठी नागपूर येथे 'महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था' स्थापन करणार. भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था यासाठी सहकार्य करणार. नागपूरमध्ये आरोग्य व उद्योग प्रकल्प बहु-विशेषता रुग्णालय आणि सौरऊर्जा उत्पादन प्रकल्प यांसारख्या गुंतवणुकींना चालना दिली जाईल.
राष्ट्रीय महामार्ग व मेट्रो विकास
नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि वर्धा बंदरांना जोडण्यासाठी नवा-भंडारा मल्टिमोडल वाहतूक कॉरिडॉर विकसित केला जाणार. मुंबई, पुणे व नागपूरसाठी ४९० किमी मेट्रोचे जाळे उभारले जाईल. यामुळे १७३ किमीच्या मार्गिका खुल्या होतील. याचा नागपूरला विशेष लाभ होईल.
