उमरेडच्या ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट! ११ कामगार होरपळले; ८ जखमींवर मेडिकलमध्ये उपचार

By जितेंद्र ढवळे | Updated: April 12, 2025 12:07 IST2025-04-12T12:05:34+5:302025-04-12T12:07:45+5:30

तिघांचा मध्यरात्रीनंतरही शोध नाही

5 dead in explosion at aluminium foil factory in Maharashtra Umred of Nagpur | उमरेडच्या ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट! ११ कामगार होरपळले; ८ जखमींवर मेडिकलमध्ये उपचार

उमरेडच्या ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट! ११ कामगार होरपळले; ८ जखमींवर मेडिकलमध्ये उपचार

शरद मिरे, लोकमत न्यूज नेटवर्क, उमरेड: उमरेडमधील एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू आहेत. यासोबत तीन कामगारांचा मध्यरात्रीनंतरही शोध लागलेला नाही. यास उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांनी दुजोरा दिला. मध्यरात्री १ वाजतानंतरही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सायंकाळी ६ वाजता कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना प्रारंभी उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. रात्री उशिरा सर्वच जखमी कामगारांना नागपूर येथे आणण्यात आले. उमरेड एमआयडीसीत एमएमपी ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास या कंपनीत जोराचा स्फोट झाला.

कच्च्या ॲल्युमिनियम पावडरचा उपयोग करून ॲल्युमिनियम फाॅइलला पॉलिश करण्याचे काम ज्या मशीनमध्ये केले जाते, ती मशीन हाताळत असताना, कंपनीत अचानक स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, उमरेडचे ठाणेदार धनाजी जळक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी अग्निशमन दलासह रुग्णवाहिकांना पाचारण करून स्फोटातील जखमी कामगारांना बाहेर काढत उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये रवाना केले. दरम्यान, नागपूर महापालिकेच्या लकडगंज आणि सक्करदरा झोनमधील दोन अग्निशमन वाहने आणि सात जवान घटनास्थळी रवाना करण्यात आले. आ. संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे यांनी घटनास्थळी भेट देत कामगारांशी संवाद साधला.

१५० कामगार बचावले

या कंपनीत एकूण ४५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान, कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले.

कंपनीत चार युनिट

या कंपनीत चार युनिट आहेत. स्फोट ज्या ठिकाणी झाला तिथे २२ कामगार कर्तव्यावर होते, अशी माहिती आहे. विनोद खंडेलवाल या कंपनीचे संचालक तर ललित भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

अशी आहेत जखमींची नावे

पीयूष बाबाराव टेकाम (२१, रा. पांजरेपार), पीयूष वासुदेव दुर्गे (२०, रा. पांजरेपार), मनीष अमरनाथ वाघ (२०, रा. पेंढराबोडी), करण भास्कर बावणे (२१, पेंढराबोडी), करण तुकाराम शेंडे (२०, रा. गोंडबोरी), कमलेश सुरेश ठाकरे (३०, रा. गोंडबोरी), सचिन पुरुषोत्तम मसराम (२६, रा. पांजेरपार), नवनीत कुंभारे (२७, रा. पांजरेपार) अशी जखमींची नावे आहेेत. हे सर्व कामगार भिवापूर तालुक्यातील राहणारे आहेत.

Web Title: 5 dead in explosion at aluminium foil factory in Maharashtra Umred of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.