होळीला गावी जायचेय पण तिकीट मिळत नाही? कोकण रेल्वे चालवतेय ६ विशेष ट्रेन; पाहा, टाइमटेबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:35 IST2026-02-27T19:29:16+5:302026-02-27T19:35:15+5:30
Konkan Railway Special Trains For Holi 2026: होळीसाठी सहा अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

होळीला गावी जायचेय पण तिकीट मिळत नाही? कोकण रेल्वे चालवतेय ६ विशेष ट्रेन; पाहा, टाइमटेबल
Konkan Railway Special Trains For Holi 2026: होळी हा संपूर्ण देशात साजरा केला जाणारा विशेष सण आहे. मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शिमगोत्सवासाठी हजारो कोकणवासी आवर्जून गावी जातात. शिमगोत्सव, होळीसाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. होळीसाठी सहा अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पनवेल – रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे. दिवा – चिपळूण अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल – रत्नागिरी – पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील.
कधी सुरू होणार मध्य रेल्वेच्या या विशेष रेल्वे सेवा?
ट्रेन क्रमांक ०११५७ मेमू विशेष रेल्वे सेवा २७ फेब्रुवारीपासून धावण्यास सुरुवात झाली. तर, २८ फेब्रुवारी, १ मार्च रोजी पनवेल येथून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०११५८ मेमू विशेष रेल्वेगाडी २७ फेब्रुवारीपासून धावण्यास सुरुवात झाली. तर, २८ फेब्रुवारी, १ मार्च रोजी रत्नागिरी येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ४.१० वाजता पनवेलला पोहोचेल.
पनवेल – रत्नागिरी – पनवेल रेल्वेला कुठे असणार थांबे?
पनवेल – रत्नागिरी – पनवेल मेमू सेवा सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, कडवई, संगमेश्वर रोड, उक्शी आणि भोके या स्थानकांत थांबा असेल. या मेमूला ८ मेमू डबे असतील.
दिवा ते चिपळूण २ मार्च ते ८ मार्च मेमू सेवा
ट्रेन क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष रेल्वे सेवा २ मार्च ते ८ मार्चदरम्यान दररोज रात्री ११.२५ वाजता दिवा येथून सुटेल आणि चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष रेल्वेगाडी १ ते ८ मार्चदरम्यान दररोज दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता पोहोचेल.
दरम्यान, दिवा-चिपळूण विशेष सेवेला निळजे, तळोजा पाचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी येथे थांबा देण्यात येईल.