यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेता येणार, तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 06:37 AM2021-01-21T06:37:13+5:302021-01-21T06:37:18+5:30

आठवड्यातून चार दिवस मुंबईतील दहा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र याआधी कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव ज्या केंद्रावर आहे, तिथेच लस घ्यावी लागत होती.

Vaccination can be done at any center even if the name is not in the list, 52% of the employees are vaccinated on the third day | यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेता येणार, तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण

यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेता येणार, तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Next

मुंबई : कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांनी केंद्रावर हजेरी लावली. कोविन ॲपमधील गोंधळ, कर्मचाऱ्यांमध्ये भीती, आदींमुळे दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम फोल ठरत आहे. यामुळे नोंदणी झाल्यानंतरही यादीत नाव नसलेल्या कर्मचाऱ्यांना मुंबईतील कोणत्याही केंद्रावर जाऊन लस घेण्याची सूट आता पालिकेने दिली.

गेल्या शनिवार (दि. १६) पासून मुंबईत लसीकरण मोहीम सुरू झालीहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ती दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा ती मंगळवार पासून सुरू झाली. त्यानुसार कर्मचाऱ्यांना पालिका विभागस्तरावरील वॉर रूमद्वारे फोन करून लसीकरणास येण्याचा संदेश देण्यात आला. बुधवारी ३३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावले होते. यापैकी १७२८ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. दिलेल्या विभागातच लस घेण्याची अट शिथिल केली आहे.

आठवड्यातून चार दिवस मुंबईतील दहा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र याआधी कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव ज्या केंद्रावर आहे, तिथेच लस घ्यावी लागत होती. परंतु बुधवारपासून ज्यांचे नाव कोविन अ‌ॅपमध्ये आहे, अशा कर्मचाऱ्यांना पालिकेच्या कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कर्मचारी जवळच्या केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतील.

केईएम आतापर्यंत लसीकरण प्रक्रियेत अग्रक्रमी -
केईएम रुग्णालय लसीकरण प्रक्रियेत अग्रक्रमी आहे. मागील तीन दिवसांत ९१२ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. बुधवारी यादीतील ५०० पैकी ३६२ जणांनी लस घेतल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. तर सायन रुग्णालयात यादीतील ४०० पैकी १३५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. नायरमध्ये यादीतील ३०० पैकी १५४ कर्मचाऱ्यांना लस दिल्याचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी स्पष्ट केले. 

जे.जे. रुग्णालयात दिवसभरात केवळ १५ जणांना लस -
कोवॅक्सिन लस राज्यातील सहा ठिकाणी देण्यात येत आहे. त्यामध्ये चार वैद्यकीय महाविद्यालये आणि दोन जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. या लसीचे २० हजार डोसेस प्राप्त झाले असून ते सर्व जिल्ह्यात पोहोचविण्यात आले. जे. जे. रुग्णालयात दुसऱ्या दिवशी १५ जणांनीच लस घेतली. काहींना लसीचा दुष्परिणाम म्हणून सौम्य लक्षणे आढळून आल्याचे समजते. वांद्रे- कुर्ला संकुल जम्बो कोरोना केंद्रात १३५ कर्मचाऱ्यांना लस दिली आहे.

कोविन ॲपमध्ये तांत्रिक समस्या कायम -
कोविन ॲपमध्ये तांत्रिक समस्या कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. यापूर्वी ॲपमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे आढळल्याने लसीकरणाला स्थगिती दिली होती. मुंबईत पहिल्या दिवशी पालिकेचे चार हजार लसीकरणाचे लक्ष्य होते, मात्र प्रत्यत्रात १,९२६ कर्मचाऱ्यांचेच लसीकरण झाले. ॲप धीम्या गतीने कार्यरत आहे. याविषयी, केंद्र शासनाशी सातत्याने चर्चा सुरू असून तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येतील आणि नियोजनानुसार लसीकरण होईल अशी माहितीपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीकरणात दोन टक्के वाढ -
बुधवारी ३,३०० लाभार्थ्यांपैकी १,७२८ जणांचे लसीकरण झाले. यावेळी सात कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रास झाला. एक लाख २५ हजार कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नाव नोंदवले असून, आतापर्यंत सहा हजार १५१ कर्मचाऱ्यांना लस दिली आहे.

भीती कमी करण्यास समुपदेशन -
लस घेतल्याने गंभीर दुष्परिणाम झाल्याचे एकही तक्रार नाही. तरीही बहुसंख्य आरोग्य कर्मचारी लस घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न पालिकेतील वैद्यकीय अधिकारी करणार आहेत.

बुधवारी झालेले लसीकरण -
रुग्णालय व कर्मचारी संख्या -

केईएम - ३६२, सायन - १३५, कूपर - १४९, नायर - १५४, व्ही. एन. देसाई-५७, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय-३०६, राजावाडी - २६२, वांद्रे-कुर्ला संकुल लसीकरण केंद्र - १३३, भाभा रुग्णालय - १५५, जे. जे. रुग्णालय - १५
एकूण - १,७२८

Web Title: Vaccination can be done at any center even if the name is not in the list, 52% of the employees are vaccinated on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.