पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा वेग वाढणार, कोंडी कमी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:30 IST2026-04-20T16:28:49+5:302026-04-20T16:30:18+5:30

महापालिका करणार ६० कोटींचा खर्च; पावसाळ्यापूर्वी पाच उड्डाणपुलांची प्राधान्याने डागडुजी  

Traffic speed will increase on the Eastern Expressway, reducing congestion! | पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा वेग वाढणार, कोंडी कमी होणार!

पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा वेग वाढणार, कोंडी कमी होणार!

जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाच्या पाच उड्डाणपुलांची  झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठी योजना हाती घेतली असून त्यासाठी ६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे हे उड्डाणपूल खड्डेविरहित होतील आणि वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिकेने विक्रोळी उड्डाणपूल सुस्थितीत आणण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.

कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, विक्रोळी- जेव्हीएलआर, मुलुंड आणि चेंबूर - सांताक्रूझ लिंक रोड हे पूर्वद्रुतगती महामार्गावरील महत्त्वाचे उड्डाणपूल आहेत. या महामार्गावर अलीकडच्या काळात वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे  उड्डाणपुलांवरील भारही वाढला असून उड्डाणपुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मध्यंतरी काही भागात डांबर टाकून पॅचवर्क करण्यात आले होते. आता मात्र कायमस्वरूपी डागडुजी केली जात आहे.

पहिल्या टप्प्यात विक्रोळी पुलाच्या पृष्ठभागाचे काम

या उड्डाणपुलांपैकी कुर्ला पूल हा अलीकडच्या काळात बांधला गेला असल्याने त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता नाही; परंतु  अन्य पुलांची डागडुजी गरजेची झाली आहे.  त्यादृष्टीने पालिकेच्या रस्ते विभागाने ६० कोटी रुपयांची निविदा काढली असून पहिल्या टप्प्यात विक्रोळी पुलाच्या पृष्ठभागाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणचे काम जवळपास पूर्ण होत आले असून त्यानंतर जेव्हीएलआर पुलाचे काम सुरु केले जाईल, अशी माहिती रस्ते विभागातील वरिष्ठ इंजिनिअरने दिली. ही कामे प्रामुख्याने मध्यरात्र ते पहाटेच्या वेळेत केली जात आहेत.

वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे ‘जेव्हीएलआर’चे आव्हान 

जेव्हीएलआर पुलावरून वाहतूक पुढे ठाण्याच्या दिशेने जाते. तर  पुलाखालून डावे वळण घेतल्यानंतर गांधीनगर, पवई आणि पुढे पश्चिम उपनगरापर्यंत थेट जोगेश्वरी पर्यंत जाता येते. त्यामुळे या पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात वाहतूक एकवटते. परिणामी येथे काम करताना मोठे आव्हान असणार आहे. जेव्हीएलआरनंतर मुलुंड, ऐरोली उड्डाणपूल दुरुस्ती जेव्हीएलआर नंतर मुलुंड आणि  ऐरोली उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे;अर्थात पृष्ठभाग समतल करण्याचे काम सुरू होईल. त्याचवेळेस लिंक रोडचेही काम होईल. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत.

विक्रोळी पादचारी पुलाच्या बांधकामाला मुहूर्त कधी? 

महामार्गावर विक्रोळी - कन्नमवार नगर येथील अत्यंत धोकादायक पादचारी पूल बंद करून जवळपास वर्ष झाले. जुना पूल पाडण्यातही आला; मात्र त्याजागी नवा सांगाडा बसविण्याच्या कामास अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

Web Title : ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे: गति बढ़ेगी, भीड़ कम होगी!

Web Summary : मुंबई के ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर यातायात सुगम होगा क्योंकि नगर पालिका पांच प्रमुख फ्लाईओवर की मरम्मत के लिए ₹60 करोड़ का निवेश कर रही है। मानसून से पहले काम पूरा करने के उद्देश्य से विक्रोली फ्लाईओवर से काम शुरू होता है। कन्नमवार नगर के लिए एक नए पैदल यात्री पुल की भी योजना है।

Web Title : Eastern Express Highway: Speed to Increase, Congestion to Decrease!

Web Summary : Mumbai's Eastern Express Highway will see smoother traffic flow as the municipality invests ₹60 crore to repair five key flyovers. Work begins with the Vikroli flyover, aiming for completion before the monsoon season. A new pedestrian bridge is also planned for Kannamwar Nagar.